अग्निपंख फाऊंडेशनच्या नागपूर विभागीय समन्वयक पदावर दामोदर डहाळे यांची नियुक्ती

4

उपक्रमशील शिक्षक म्हणून गुणगौरव

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक दामोधर राजाराम डहाळे यांचा अग्निपंख फाऊंडेशनच्या नागपूर विभागीय समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच उपक्रमशील शिक्षक म्हणून प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.

कोविड 19 मुळे हा सोहळा ऑनलाईन घेण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास संपूर्ण राज्यातील मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास उराशी बाळगलेल्या राज्यभरातील उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने तसेच इतरांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने, त्यांचा सत्कार व गुणगौरव करण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन १६ डिसेंबर २०१७ ला मिलिंद कुबडे, नितीन भालचक्र, दीपक मेश्राम, ओंकार चेके व गजानन गोपेवाड या सर्व संस्थापक सदस्यांच्या पुढाकाराने व प्रयत्नाने ‘अग्निपंख फाऊंडेशन’ महाराष्ट्र राज्य या समूहाची स्थापना करण्यात आली.

विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील मनाचे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध असलेले, विद्यार्थी हिताचे शैक्षणिक व सहशालेय उपक्रम अभिनव पद्धतीने राबवणारे, इंग्रजी विषयासंदर्भात TAG (Teacher Activity Group) व MOOC (Massive Open Online Course) चे समन्वयक, लेखन, कविता निर्मिती व गायन क्षेत्रात अग्रेसर, सामाजिक कार्यात सदैव तत्पर विशेषतः अग्निपंख फाऊंडेशनसाठी पूर्णतः समर्पित असल्याने संस्थापक मंडळ व निवड समितीने दामोधर डहाळे यांच्यावर विश्वास दाखवत यांना अग्निपंख फाऊंडेशनच्या नागपूर विभागीय समन्वयक पदी नियुक्ती केली.

भारतरत्न माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त दिनांक २७ जुलैला त्यांच्या कार्याचा गुणगौरव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी घरीच राहून नवोपक्रम घेण्यात आला होता. त्या अभिनव उपक्रमात राज्यभरातून शेकडो शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने उदंड प्रतिसाद लाभला होता.

त्या कार्यक्रमात सहभाग घेऊन अभिनव पद्धतीने उपक्रमाचे सादरीकरण करणाऱ्या व निवड समितीकडून प्रथम क्रमांकाने निवड झालेल्या भंडारा जिल्हाच्या तुमसर तालुक्यातील दामोधर डहाळे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद कुबडे (प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यवतमाळ), प्रमुख पाहुणे दीपक चवणे (माध्यमिक शिक्षणाधिकारी यवतमाळ), नितीन भालचक्र (अधिव्याख्याता गणित विभाग प्रमुख), दीपक मेश्राम (अधिव्याख्याता विज्ञान विभाग प्रमुख), डॉ. राजेश डहाके व निवड समितीचे सदस्य ओमकार चेके, राम राठोड, महेश कुमार यांच्या हस्ते ऑनलाईन प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजक गजानन गोपेवाड (राज्य समन्वयक) हे होते तर सूत्रसंचालन व नियोजन जयश्री सिरसाटे (महिला राज्य समन्वयक) यांनी केले. प्रस्तावना सुवर्णा सातपुते (जिल्हा समन्वयक पुणे), तंत्रविभाग ऋतुजा कसबे (जिल्हा समन्वयक मुंबई), आभार अश्विनी वास्कर (जिल्हा समन्वयक यवतमाळ) यांनी मानले.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here