Shrirampur : विजेचा शाॅक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; महांकाळ वाडगाव येथील घटना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील किशोर रामनाथ पवार (वय-३२) या तरुण शेतकऱ्याचा आज शनिवार (दि.१९) रोजी सकाळच्या सुमारास शेतात काम करत असताना विजेचा शाॅक लागून जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, किशोर पवार यांची महांकाळवाडगाव येथे गोदावरी नदीलगत गट नं.२७ मध्ये शेती असून आज शनिवार (दि.१९) सकाळी ते आपल्या शेतातील उसाला खत टाकत होते. माञ, महांकाळवाडगाव परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतात असलेल्या वीज वाहक तारा खाली आल्या होत्या.

खत टाकण्याच्या कामात उसामध्ये खाली आलेल्या वीज वाहक तारांचा अंदाज न आल्याने त्यांना विजेचा शाॅक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर शेजारील शेतात असलेल्या शेतकऱ्याच्या ही घटना लक्षात आल्याने त्यांनी तातडीने याची माहिती गावात दिली. त्यानंतर गावातील नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या मृतदेहावर महांकाळवाडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,भाऊ,आईवडील असा परिवार आहे. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिसात अकस्मात मृत्यु नं.३८ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि.मसूद खान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बर्डे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here