Rahata : हल्ला करून बिबट्याने चार शेळ्या केल्या फस्त

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शहरातील पंथरा चारी भागातील लुटे वस्तीवर शेडमध्ये बंदिस्त असलेल्या शेळ्यांवर हल्ला करून बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला तर एक शेळी गंभीर जखमी केली आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पंधरा चारी परिसरातील प्रभाकर लुटे व त्यांच्या भावाचे वस्तीवर एका शेडमध्ये बंदिस्त असलेल्या बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला चढविला चारही बाजूने तारेचे कुंपण व वरून छत असलेल्या शेडमध्ये दहा बारा शेळ्या होत्या. बिबट्याने या शेडमध्ये प्रवेश करून शेळ्यावर हल्ला केला. यामध्ये दोन बोकड व दोन शेळ्यांचा फडशा पाडला व एका शेळीला गंभीर जखमी केले. बिबट्याचा हल्ल्यात लुटे यांच्या चार बकऱ्या मारल्या गेल्याने यामध्ये शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

लुटे वस्तीवर बिबट्याने यापूर्वी चार वेळा हल्ला केला होता. ही पाचवी घटना असून आजपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात लुटे यांच्या जवळपास पंधरा शेळ्यांचा फडशा पडलेला आहे. वारंवार बिबट्या याच वस्तीवर येतोय वनविभागाने यापूर्वी दोनदा या ठिकाणी बिबट्याला जेरबंद केलेले आहे. तरीपण लुटे वस्तीवरील शेळ्यांचा फडशा पाडण्याचे सत्र बिबट्याने सुरू ठेवले आहे.

या शेतकऱ्याला वन विभागाकडून एकदा तुटपुंजी मदत मिळाली. मात्र, त्यानंतर शेतकऱ्याचे पदरात कागदी पंचनाम्या शिवाय काही पडले नसल्याचे शेतकऱ्यांने सांगितले. या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून दोन तीन बिबटे आढळत असल्याचे परिसरातील नागरिक बोलत आहे. वनविभागाने तातडीने या परिसरात दोन तीन ठिकाणी पिंजरे लावावेत. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे अजून किती बकऱ्यांचा व प्राण्यांचा जीव जाण्याची वनविभाग वाट बघणार आहे ? असा संतप्त सवालही प्राणीप्रेमी नागरिक व शेतकरी उपस्थित करीत आहे.

बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजुरांना शेतातील कामे करणे सुद्धा जिविताच्या दृष्टीने धोकादायक बनत झाले आहे. तर रात्री-अपरात्री बाहेर बांधलेल्या जनावरांना चारापाणी करणे सुद्धा धोक्याचे वाटू लागले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावा, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here