Rahuri : किरकोळ वादातून झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी शहरात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून संजय थोरात या ५५ वर्षीय इसमाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना (दि. १९) सायंकाळी शनिचौक परिसरात घडली आहे. या घटनेतील आरोपी विशाल लांडे याला राहुरी पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे.

राहुरी शहरातील बालाजी मंदिर परिसरात राहणारा विशाल संभाजी लांडे वय 26 वर्षे. हा तरुण आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरात असलेल्या बोरा मेडिकल समोर मावा घेण्यासाठी थांबला होता. यावेळी त्या ठिकाणी संजय सुगंधा थोरात वय वर्षे ५५, राहणार वडगाव गुप्ता हा इसम त्या ठिकाणी आला. यावेळी मावा घेण्याच्या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नंतर दोघांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी विशाल लांडे हा घटनास्थळावरून निघून गेला. आणि दहा मिनिटाने हातात काठी घेऊन परत आला. यावेळी आरोपी विशाल लांडे याने संजय थोरात या इसमाला काठीने मारहाण केली. या घटनेत विशाल लांडे हा जखमी झाला होता. मात्र संजय सुगंधा थोरात हा इसम जागेवरच गतप्राण झाला. अशी परिसरात चर्चा सुरू आहे.

घटनेची मिहिती मिळताच पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन बागुल व यशवंत राक्षे तसेच पोलिस उप निरीक्षक निरज बोकिल, पोलिस नाईक प्रविण खंडागळे, आदिनाथ पाखरे, सागर माळी आदि पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संजय थोरात या इसमाला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी संदीप आठरे यांनी थोरात यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. यावेळी शहरातील अनेक तरूणांनी रूग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. यावेळी आरोपी विशाल संभाजी लांडे याला पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतले. या घटनेबाबत राहुरी पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

संजय थोरात हा इसम मुळचा नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील रहिवाशी असून तो राहुरीत कशाला आला. दोघांचे भांडण नेमक्या कोणत्या कारणावरून झाले. याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here