सांगोला, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकरी उध्वस्त

  4

  अनेकांचे संसार गेले वाहून

  दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असलेल्या सांगोला, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हजारो शेतकरी उध्वस्त झाले आहेत. अचानक 18 सप्टेंबरला रात्री सुरु झालेल्या पावसाने अनेकांचे संसार वाहून नेले तर शेतातील उभी पिके मातीसह या तुफान पावसात वाहून गेली. पंढरपूर तालुक्यातील उपरी, पळशी, सुपली परिसरात झालेल्या तुफान पावसाने आज दोन दिवसानंतर आलेले पुराचे पाणी ओसरल्यावर शेतकरी आता नुकसानीची पाहणी करायला आपल्या शेताकडे आणि घराकडे परतू लागली आहेत.

   

  या दुष्काळी पट्ट्यात असलेल्या कसाळगंगा ओढ्याचे गेल्या पाच वर्षात जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात काम झाल्याने याची खोली व रुंदी वाढवण्यात आली होती. सुदैवाने याचाच फायदा या अतिवृष्टी झालेल्या गावांना झाला आहे. अन्यथा या तुफान पाण्यात अनेक गावे जलमय झाली असती. उपरी परिसरात आता दोन दिवसानंतर अजूनही अनेक शेतात गुढघ्यापेक्षा जास्त पाणी असून अजूनही शेतकऱ्यांना शेतात जात येत नाही. ओढ्याच्या काठाला असलेला ऊस, डाळिंब बागा आडव्या झाल्याने डोळ्यासमोर हाताशी आलेले पीक पाण्यात गेले आहे. या परिसरातील विजेचे खांब मोडून पडले असून रस्त्यावर सर्वत्र विजेच्या तुटलेल्या तारा दिसत आहेत. अनेक वस्त्यांवरील घरातील संसाराचे साहित्य, खाते, बियाणे, अन्न धान्य या पुरात वाहून गेलाय तर अनेक शेतकऱ्यांच्या बकऱ्या, म्हशी, शेळ्यादेखील यात वाहून गेल्याने या भागातील बळीराजा अक्षरशः उघड्यावर आला आहे.

   

  अशीच थोडीफार स्थिती सांगोला आणि माळशिरस तालुक्यातही दिसत असून येथेही शेकडो एकरावरील पिके आणि फळबागांना जलसमाधी मिळाली आहे. सांगोला तालुक्यातील कोळेगाव, महीम, वाणी चिंचाळीसह अनेक गावांना या पावसाचा फटका बसला आहे. यातील बहुतांश बंधारे, ओढे नाले ओव्हर फ्लो झाल्याने अनेक घरात पाणी घुसले तर शेतातील पिके पाण्यात वाहून गेली आहेत. माळशिरस तालुक्यातील अत्यंत दुष्काळी मानल्या जाणाऱ्या पिलीव भागालाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याने 30 पेक्षा जास्त घरे पडली आहेत. आता या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सचिव दीपक साळुंखे यांनी दौरा करून तातडीने मदत देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली आहे. आज दुपारी माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी केली असून काही ठिकाणी महसूल प्रशासनाकडून पंचनाम्यास सुरुवात झाली आहे.

   

  जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गिरणा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्याने त्याचा परिणाम म्हणून जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीला मोठा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे. हा पूर पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी नदी काठावर गर्दी केल्याच दिसून येत आहे. गिरणा नदीला आलेला पूर पाहता काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

   

  इंदापूर शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गासह व्यापारी वर्गाला मोठ्या नुकसानाला तोंड द्यावे लागत आहे. इंदापूर शहरातील प्रशासकीय भावना शेजारी असलेल्या नगरपालिकेच्या गाळ्यात पाणी शिरल्याने व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झालेले आहे. या मुसळधार पावसाचे पाणी भाटनिमगाव मधील राजेश साळुंखे या शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये धुसले आणि शंभर ते दीडशे पक्षी वाहून गेले तर अंदाजे सातशे ते आठशे पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी साठून राहिल्याने हवा हवासा वाटणारा पाऊस आता नकोसा झालेला आहे.

  4 COMMENTS

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here