Aurangabad : दुकान फोडून रोख रक्कम लंपास

रामनगर भागातील घटना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 
दुकानांची शटर उचकटून रोख लंपास केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दुकान फोडणा-या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. मध्यरात्री दुकान फोडून रोकड लंपास होत असल्याने व्यापा-यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यातच १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरांनी रामनगर भागात दोन दुकान फोडून ४० हजार ७५८ रुपये लांबवले.

महिनाभरापूर्वीच हर्सुल, गारखेडा, सातारा, एमआयडीसी वाळुज भागात दुकानांची शटर फोडून चोरांनी रोकड लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, पोलिसांच्या हाती अद्याप एकही मोठी टोळी लागलेली नाही. वारंवार घडणा-या दुकान फोडीच्या घटनांमुळे पोलिस हैराण झाले आहेत. पोलिसांचा वचक नसल्यामुळे अशा घटना सतत घडत असल्याची चर्चा आता व्यापारी वर्गात सुरू आहे.

पुंडलिकनगर आणि गुन्हे शाखा पोलिसांनी दुकाना फोडणा-या अल्पवयीन बालकांनासह त्यांच्या साथीदारांना पकडले आहे. मात्र, तरी देखील चो-या थांबता थांबेना असेच चित्र सध्या शहरात आहे. त्यातच १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरांनी रामनगर भागात दोन दुकाना फोडून रोकड लंपास केली. राजेंद्र गजानन जोशी (४९, रा. महाजन कॉलनी) यांचे रामनगरात सर्वेश इंटरप्राईजेस नावाचे दुकान आहे. रात्री नऊच्या सुमारास जोशी दुकान बंद करुन घरी गेले होते.

त्यानंतर चोरांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील दीड हजाराची रोख लांबवली. तसेच शेजारी असलेल्या आनंद सुरेशलाल जैस्वाल यांच्या आनंद बियर शॉपीचे शटर उचकटून गल्ल्यातील ३९ हजार २५३ रुपये लांबवले. हा प्रकार सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आल्यावर जोशी आणि जैस्वाल यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास जमादार जगदाळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here