Maratha Reservation agitation : मराठा समाजाचे राज्यभर वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन

  0

  मुंबईत घंटानाद, तर सोलापुरात जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या मठाबाहेर आंदोलन, माढ्यात टायर जाळले, माळशिरस-पंढरपूर रस्त्यावरही टायर जाळून आंदोलन

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

  आरक्षणासाठी मराठा समाज प्रचंड आक्रमक बनला आहे. यासाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभर वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केले जात आहे. मुंबईत घंटानाद, तर सोलापुरात जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या मठाबाहेर आंदोलन, माढ्यात टायर जाळले, माळशिरस-पंढरपूर रस्त्यावरही टायर जाळून आंदोलन करण्यात आले.

  मराठा क्रांती मोर्चाचं आरक्षण कोर्टानं स्थगित केल्यानंतर आज मराठा मोर्चाकडून आज गोरेगाव दिंडोशी येथे घंटा नाद आंदोलन करण्यात येत आहे . दिंडोशीत घंटानाद करून त्या नंतर स्थानिक शिवसेना आमदार सुनील प्रभू आणि शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांना निवेदन दिलं जाणार आहे . आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे आम्ही आमची मागणी करण्यासाठी त्यांना निवेदन देत असल्याच मोर्चेकरांचं म्हणणं आहे.

  भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या मठाबाहेर सकल मराठा समाजाने आंदोलन केलं. खासदार जयसिद्धेश्वर स्वामी दिल्लीत असल्याने त्यांच्या मठाचे सचिव जयशंकर शेट्टी यांनी सकल मराठा समाजाचे निवेदन स्वीकारले. यानंतर मठाबाहेरचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. केंद्रातून लवकरात लवकर आरक्षणाचा वटहुकूम काढला नाही तर अधिक तीव्र आंदोलन करु असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिलाय.

  पंढरपुरातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. माळशिरस-पंढरपूर रस्त्यावर टायर जाळत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरसह अनेक भागात बंद पाळण्यात आला आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे 2 हजार पोलीस तैनात केले आहेत.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here