Newasa : शिरेगावकरांमुळे वाचले पाथर्डीच्या तरुणाचे प्राण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
करजगांव : नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील तुवर वस्तीजवळ ओढ्याचे पुराचे पाण्यात वाहून जात असलेल्या मिरी (ता.पाथर्डी) येथील तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी केलेल्या धाडसामुळे प्राण वाचले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील आण्णासाहेब ज्ञानदेव नेहूल हा तरुण नेवासा तालुक्यातील करजगाव येथे आपल्या पाहुण्यांकडे भेटायला येत होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे मुळा काठ परिसरातील सर्वच ओढे-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.

ओढ्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने सदर तरूण मोटारसायकलसह पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला.
त्यांच्या पत्नीने आरडा ओरड केल्यावर शेजारील तुवर वस्तीवरील काही युवक पळत आले. त्यांनी सर्व घटना बघताच त्यांनी तात्काळ दोरखंड आणूण त्या तरुणापर्यंत मोठ्या जिकरीने पोहचवला. गणेश जाधव, भरत तुवर, सुधाकर तुवर, धनराज तुवर, भानुदास माकोने, शरद माकोणे, सिताराम काशीनाथ जाधव, रमेश तुवर, संग्राम माकोने, अजिंक्य तुवर, बायजी जाधव, गोरख तुवर , पांडुरंग जाधव या तरुणांनी युवकास दोरखंडाने ओढून प्रवाहाबाहेर काढले. मात्र, युवकाची मोटर सायकल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.
सुमारे अर्धातास चाललेल्या या चित्तथरारक घटनेमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. शेजारील तुवर वस्तीवर दोन दिवसापुर्वी दुःखत घटना घडली असून देखील तेथील युवकांनी दाखवलेली तत्परता व केलेली मदत यामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. प्राण वाचलेल्या युवकाने व त्याच्या पत्नीने या तरुणांचे आभार मानले.
यावेळी ते दोघे पतिपत्नी भावनिक झाले होते. सीताराम जाधव यांनी संबंधितांना करजगावला पोहच केले. शिरेगावातील तरूणांच्या धाडसाचे नामदार शंकरराव गडाख यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here