Sangamner : सुमारे 10 लाखाचा गांजा जप्त, तीन आरोपी ताब्यात…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेर शहर पोलिसांनी शहरातील कटारिया नगर परिसरातील एका घरावर छापा टाकून नऊ लाख 86 हजार 944 रुपयांचा गांजा व इतर साहित्य जप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. नजीकच्या काळातील संगमनेर शहर पोलिसांची ही मोठी कारवाई ठरली असून, या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्री करणारे मोठे रॉकेट पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यातील पोलीस राणा प्रतापसिंग परदेशी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, पोलिसांनी जय योगेश्वर दगू गायकवाड वय 24 (मुळ रा. रांजणगाव  देशमुख, हल्ली रा.शंकर टाऊनशिप कटारीयानगर, संगमनेर), दीपक सुरेश तुपसुंदर वय 34, (खंडेश्वर मंदिराजवळ, खांडगाव, ता. संगमनेर) व विशाल निवृत्ती आरणे वय 26, (मुळ रा. रांजणगाव देशमुख, हल्ली रा. दिवेकर एजन्सी जवळ मालदाड रोड, संगमनेर) या तिघांना अटक करून 9 लाख 86 हजार 944 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शहराजवळील कटारीयानगर या उपनगरातील काही तरुणांकडे आमली पदार्थ असल्याची खबर शहर पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी  घटनास्थळी छापा टाकून या घरातून पोलिसांना स्वयंपाक खोलीच्या कोपर्‍यात चार गोण्या ठेवलेल्या दिसल्या. या गोण्यातून पोलिसांना गांजा असल्याचे लक्षात आले. या उघडल्या नंतर या गोण्यांमध्ये हिरवट पाने, काड्या, बिया, वनस्पतीचे शेंडे दिसून आले. हा चार गोण्यात गांजा पोलिसांना मिळाला तर येथूनच एक वाजनकाटा, काही छोट्या-छोट्या पिशव्या, चार गोण्या असा 6 लाख 16 हजार 944 रुपयांचा मुद्देमाल तर 3 लाख 10 रुपयांची स्विफ्ट कार, व 60 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाइल व अन्य साहित्य, असे एकूण 9 लाख 86 हजार 944 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत व पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे करीत आहेत. या घटनेमुळे संगमनेरमध्ये किती मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा व्यवसाय कार्यरत होता. हे उघड झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here