Aurangabad : आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन महिलेच्या व्हॉटसअ‍ॅपवर अश्लिल मेसेज

जालन्यातील वॉचमनचा प्रताप; ग्रामीण सायबर पोलिसांनी जालन्यात पकडले

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 
अ‍ॅपच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकाचा वापर करून पिसादेवी येथील महिलेच्या व्हॉटसअ‍ॅपवर अश्लिल मेसेज पाठवून मानसिक त्रास देणा-या जालन्यातील वॉचमन तरुणाला ग्रामीणच्या सायबर पोलिसांनी गजाआड केले. ७ सप्टेंबर पासून सायबर पोलिस त्याचा शोध घेत होते. गणेश कालीदास जाधव (२०, रा. सिध्दार्थनगर, जालना), असे या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलसाठी एक अ‍ॅप डाऊनलोड करायचा. त्याआधारे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय क्रमांक तयार करुन महिलांच्या व्हॉटसअ‍ॅपवर अश्लिल मेसेज व व्हिडिओ पाठवत होता.

पिसादेवी येथील एका विवाहितेच्या व्हॉसअ‍ॅपवर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन अश्लिल व्हिडिओ पाठवत तू मला आवडतेस, माझ्याशी मैत्री कर, असे मेसेज पाठवले जात होते. तसेच केलेले चॅटींग लगेच तो डिलीट करत होता. महिलेने ब-याचदा आंतरराष्ट्रीय क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोबाईल लागत नव्हता. पीडित महिलेने पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर ७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा सायबर पोलिसांनी बारकाईने तांत्रिक पध्दतीने तपास केला. तेव्हा हा मवाली जालन्यात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक घुगे, जमादार कैलास कामठे, संदिप वरपे, रविंद्र लोखंडे, नितीन जाधव, योगेश मोईम, सविता जायभाये, लखन पाचोळे, योगेश दारवंटे, गजानन बनसोड, रूपाली ढोले यांनी गणेश जाधव याला जालन्यातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून, न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत कोठडी सुनावली आहे.

रिकाम्यावेळेत रिकामे काम अंगलट
गणेश जाधव हा लॉकडाऊनच्या आधी भावासोबत केटरिंगचा व्यवसाय करत होता. मात्र, लॉकडाऊन लागल्यामुळे त्याचा व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे तो खासगी ठिकाणी वॉचमन म्हणून कार्यरत होता. या रिकाम्या वेळेतच त्याने रिकामे उद्योग सुरु केले. मोबाईलमध्ये विशिष्ट अ‍ॅप डाऊनलोड करुन त्याव्दारे आंतरराष्ट्रीय क्रमांक मोफत मिळवायचा. त्या क्रमांकाचे वेगवेगळे व्हॉटसअ‍ॅप खाते तयार केले. त्या क्रमांकांवरुन तो पिसादेवी परिसरातील एका महिलेला अश्लिल मेसेज पाठवत होता.

पोलिसांचे आवाहन….
अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कोणालाही अश्लिल अथवा इतर मेसेज आले असतील, तर त्यांनी तात्काळ सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here