Rahuri : गागरे हॉस्पिटल येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यास नागरिकांचा विरोध

1
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या गागरे हॉस्पिटल येथे सुरू होत असलेल्या कोविड केअर सेंटरला या परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे. तसेच याबाबत तहसीलदार फसिओद्दीन शेख यांना निवेदन देण्यात आले आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून राहुरी तालुक्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. दिनांक २० सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत राहुरी तालुक्यात एकूण १ हजार ३९३ जण कोरोना बाधित झाले. त्यापैकी १ हजार ८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर ३४७ जणांवर उपचार सुरू आहेत तसेच ३८ जण मयत झाले आहेत. अशा परिस्थितीत राहुरी तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना बाधितांना उपचार देण्यासाठी रुग्णालयात जागा शिल्लक नाही. त्यामुळे प्रशासन आता खाजगी रुग्णालये ताब्यात घेऊन तेथे कोविड सेंटर सुरू करत आहे.

राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या बिरोबा नगर येथे गागरे हॉस्पिटल ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, या परिसरातील नागरिकांनी या कोविड केअर सेंटरला विरोध केला आहे. या हॉस्पिटलच्या आजूबाजूला शेकडो लोकांची घरे आहेत. दाट लोकवस्ती आहे. तसेच गागरे हॉस्पिटल परिसरात भरपूर प्रमाणात मधुमेह, रक्तदाब, हृदय रोगाचे रुग्ण आणि लहान मुले आहेत.
सदर भागात गाड्या पार्किंग करण्यासाठी आणि विलगीकरण कक्षासाठी मोठ्या प्रमाणात अडचण आहे. अशा परिस्थितीत या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू झाले तर परिसरात राहणाऱ्या लोकांना त्याचा प्रादुर्भाव होऊन कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. या भागातील जे लोक कोरोना निगेटिव्ह आहेत. ते देखील या प्रादुर्भावामुळे पॉझिटिव्ह होण्याची भीती नागरीकांनी व्यक्त केली आहे.
शहरात अनेक ठिकाणी लोक वसाहतीपासून दूर मोठे मोठे हॉल आहेत, मंगल कार्यालय आहेत. त्या ठिकाणी प्रशासनाने कोविड केअर सेंटर सुरू करावे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कोरोनाचा कोणताही धोका होणार नाही. अशी प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांनी व्यक्त करून गागरे हॉस्पिटल येथे सुरू होत असलेल्या कोविड केअर सेंटरला विरोध दर्शविला आहे. या बाबतचे निवेदन तहसीलदार फाशी उद्दीन शेख यांना देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनावर विष्णू ताठे, प्रसाद गाडे, चंद्रमोहन जग्गी, बाबासाहेब येवले, महावीर गुंदेचा, सौ. स्नेहलता शिरसाट,  रावसाहेब वराळे, किशोर गुंदेचा, डाॅ. अण्णासाहेब पवार, डॉ. मधुसूदन भागवत, बंडेशकुमार शिंदे, मनोज कुलकर्णी, रूपाली सरोदे, प्रवीण धिमते, प्रताप भांड, अमोल धनवटे, गालीब शेख, जोगिंदरसिंग कथुरिया, विजय करपे, किरण भालेकर, रवींद्र करपे, देवेंद्र झिने, कैलास शेळके आदींच्या सह्या आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here