Aurangabad : दोन वर्षापूर्वी मित्राचा खून करणारे दोघे गजाआड

0

एमआयडीसी वाळूंज पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

दारूच्या नशेत आई-बहिणीवरून शिवीगाळ करणा-या मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करणा-या दोघांना दोन वर्षानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गजाआड केले. अमोल रमेश घाटोळे (वय २१), राकेश सुरेश चौधरी (वय २१) दोघे ही राहणार विटावा, ता.गंगापूर, ह.मु.रांजणगाव-गणपती, पुणे अशी आरोपींची नावे असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी कळविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षापूर्वी ३० ऑक्टोबर २०१८ रोजी घाणेगाव ते नांदेडा रोडवरील एका शेतात भारत निवृत्ती आल्हाड (वय २७, रा.सिरसगाव, ता.गंगापूर, ह.मु. शितलनगर, विटावा गाव) हा गंभीर जखमी अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी त्याला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले होते. दरम्यान, दोन वर्षापूर्वी भारत आल्हाड याचा खून करणारे अमोल घाटोळे व राकेश चौधरी हे दोघे पुण्यात रांजणगांव गणपती येथे असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे, जमादार वसंत शेळके, खय्युम खाँ पठाण, सुधीर सोनवणे, रेवननाथ गवळे, नवाब शेख, विनोद परदेशी, मनमोहनमुरली कोलीमी, बंडू गोरे, प्रदिप कुटे, दिपक मतलबे, विशेष पोलिस अधिकारी सुरज जाधव यांनी पुण्याला जावून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघेही उडवा-उडवीची उत्तरे देत होते, पोलिसांनी खाक्या दाखविताच दोघांनी भारत आल्हाड याच्या खूनाची कबूली दिली.

दारू पार्टीतील वाद विकोपाला गेल्याने हत्या
राकेश चौधरी याचा मोबाईल भारत आल्हाड याने २ हजार ५०० रूपयात खरेदी केला होता. मोबाईल खरेदी केल्यानंतर भारत आल्हाड याने राकेश चौधरी व अमोल घाटोळे यांना एटीएम मधुन काढुन २ हजार ५०० रूपये दिले, व उर्वरीत पैशाची दारू खरेदी करून पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी दारूच्या नशेत भारत आल्हाड हा राकेश चौधरी व अमोल घाटोळे यांना आई-बहिणीवरून शिवीगाळ करीत असल्याने दोघांनी त्याचा दगडाने ठेचून खून केल्यानंतर दोघेही पुण्याला निघून गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here