Aurangabad : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

दोन जिवलग मित्रांचा मृत्यू; नक्षत्रवाडीच्या मुख्य रस्त्यावर घडला भीषण अपघात

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

औरंगाबाद : बिडकीनहून दुचाकीने शहरात येणा-या दोन जिवलग मित्रांचा नक्षत्रवाडीच्या मुख्य रस्त्यावर पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. या भीषण अपघातात एकाचा जागीच तर दुस-याचा रुग्णालयात नेताना रस्त्यातच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळावरुन धूम ठोकलेल्या ट्रक चालकाला संताजी पोलिस चौकीजवळ वाहतूक पोलिसांनी पकडले. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला.
एकनाथ किसन खैरे (३०) आणि नवनाथ तुकाराम शेजूळ (४०, दोघेही रा. तोंडूळी, ता. पैठण),अशी दोघांची नावे आहेत.

बजाज कंपनीत चार ते पाच दिवसांपूर्वी कंत्राटदारामार्फत नोकरीला लागलेले नवनाथ शेजूळ हे पूर्वी क्रेशरवर काम करायचे. त्यांनी तोंडूळी गावात शेती सुद्धा आहे. शेजूळ हे नेहमी कामानिमित्त औरंगाबादला दुचाकीवर यायचे. आज सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास मित्र एकनाथ खैरे यांना सोबत घेऊन शहरात येत होते. यावेळी नवनाथ दुचाकी चालवत होते. तर एकनाथ हे दुचाकीवर पाठीमागे बसलेले होते.
नक्षत्रवाडीच्या मुख्य रस्त्यावरुन दोघेही दुचाकीने (एमएच-२०-एफजे-६६७७) शहराकडे येत होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या मालवाहू ट्रक (यूपी-६३-ई-५६३६) चालकाने दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकनाथ यांच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेले. पाठीमागील चाक गेले तर नवनाथ यांच्या कंबर आणि गुप्तांगाला जबर मार लागला. त्यामुळे एकनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघात घडल्यावर नवनाथ यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना त्यांची रस्त्यातच प्राणज्योत मालवली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विक्रम वडणे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here