Shevgaon : कृषी विधेयक कायद्याच्या निषेधार्थ निदर्शने

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, आरपीआय व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील क्रांतीचौकात देशव्यापी भारत बंद, रास्ता रोको व निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते व शेतक-यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत तीनही कृषी विधेयकांची होळी केली.

भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय फुंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगरे, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापुराव राशिनकर आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

या वेळी नांगरे म्हणाले की, या तिन्ही कृषी विधेयक/कायदयांमुळे पिकांची सरकारी खरेदी पूर्णपणे थांबेल आणि खासगी बाजार स्थापन होऊन शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव बंद होईल. तसेच सर्व धान्य, डाळी, तेलबिया, कांदा आणि बटाटा या वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून काढल्या जातील. भाजप सरकारच्या काळात शेतकरी अधिक कर्जबाजारी झाले आहेत. सरकार वीज, डिझेल इत्यादींच्या किंमती वाढवत आहे. नवीन कृषी विधेयके पास करून शेतकऱ्यांना चढ्या भावाने खरेदी करण्यास भाग पाडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा वेग अधिक झपाट्याने वाढणार आहे.

दत्तात्रेय फुंदे म्हणाले की, भारतीय शेतकरी आणि भूमिहीनांच्या दर तासाला दोन आत्महत्या होत आहेत, पण ‘आत्मनिर्भर भारता’च्या फसव्या घोषणा देऊन भाजपचे मोदी सरकार केवळ बड्या कंपन्यांचीच धन करीत आहे. शेतकरी विधेयकाला/कायद्याला विरोध करण्याचे आणि ‘कर्जमुक्ती, पूरा दाम’ या मागण्यांसाठी किसान सभा संघर्ष समन्वय समितीने सुचवलेली दोन्ही विधेयके पास करण्यास केंद्र सरकारला भाग पाडण्यासाठी आमचा या आंदोलना सक्रिय पाठिंबा आहे.

या आंदोलनात भाकपचे तालुका सचिव भगवान गायकवाड, छबूराव मंडलिक, प्रेम अंधारे, मुरलीधर काळे, कुंडलीक काळे, शंकर देवढे, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, शहाध्यक्ष भाऊ बैरागी, अमोल देवढे, आरपीआयचे सुनिल आहुजा, गोरक्ष काकडे, दादासाहेब पाचरणे, प्रशांत घुमरे आदींसह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here