Ahmadnagar : अर्थव्यवस्था वाचविण्याऐवजी केंद्र प्रतिक्रिया देण्यात व्यस्त : आमदार रोहित पवार यांची टीका

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नगर : कोरोना काळात अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी राज्यातील स्वपक्षाला अडचणीत आणणाऱ्या मागण्या करणारे कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे जहाज बुडत असताना त्याची छिद्रे बुजविण्याऐवजी केंद्र सरकार केवळ प्रतिक्रिया देण्यात व्यस्त असल्याचे पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

आमदार रोहित पवार यांनी प्रारंभी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली मते मांडली. काही दिवसांपूर्वी त्यांनी जीएसटी संबंधी केंद्र सकारला दोष देणारे विधान केले होते. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत पवार यांनी अभ्यास करून बोलावे, असे म्हटले होते. त्यानंतर पवार यांनी जीएसटीसह अर्थव्यवस्थेसंबंधी सोशल मीडियातून अनेक पोस्ट लिहिल्या. आकडेवारी आणि विविध संदर्भ देत त्यांनी आपले मुद्दे पटवून देण्याचा सपाटाच सुरू केला होता.

हे सुरू असतानाच त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारकडे अर्थ व्यवस्थेला चालना देण्यासंबंधीच्या मागण्या करण्यासही सुरुवात केली. आपल्याच सरकारला धोरणात्मकदृष्टया अडचणीत आणणाऱ्या मागण्याही त्यांनी सुरूच ठेवल्या आहेत. राज्यातील मंदिरे उघडावीत, जीम आणि व्यायामशाळा सुरू कराव्यात, जनावरांचे बाजार सुरू करावेत, साऊंड, लाइट, जनरेटर, मंडप व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करू द्यावा, अशा अनेक मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या. कोरोना काळात अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी हे आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे.

आता त्यांनी यासंबंधी केंद्र सरकारला उद्देशून एक ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकाल प्रभाव राहील, असं दिसतंय. त्यासाठी अर्थव्यवस्था पुनरुज्जीवन करण्यासाठी कठोर धोरणं आखावी लागतील. पण दुर्दैवाने, केंद्र सरकार बुडणाऱ्या जहाजाची छिद्रे बुजवण्याचा प्रतिसाद देण्याऐवजी केवळ प्रतिक्रिया देण्यातच व्यस्त आहे. यात अनुभवाचा स्पष्ट अभाव दिसतो.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here