Human Interest : Motivational : …हॉटेल वेटर ते द्राक्ष बागायतदार, जीवन संघर्षाचा एक विलक्षण प्रवास

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

तालुक्यातील कोळगावमधील पांढरेवाडी शिवारात वडिलोपार्जित १४ एकर शेती होती पण खाण्यापूरती ज्वारी पिकत नव्हती. त्यात सन १९८९ दहावी फेल. आता काय करायचे म्हणून शरद भिवसेन भोयटे यांनी पाटसला मावस भावाच्या हॉटेल वर १४ वर्षे वेटर म्हणून काम केले. सन २००१ ला विसापूर फाट्यावर छोटेसे हॉटेलही सुरू केले. पण अंगात शेतकऱ्याचं रक्त असल्याने ओढा शेतीकडेच. त्यातूनच २० एकर जमीन खरेदी केली आणि मोहरवाडी तलावावरुन पाणी आणले. पांढरेवाडीच्या माळरानावर द्राक्ष, संत्रा आणि कढीपत्ताचा मळा फुलविला आहे.

शरद भोयटे यांचे आई वडील कोरडवाहू शेतकरी मुलांनी शिकावे अशी आई वडिलांची इच्छा. पण दहावी नापास झालो आणि आयुष्याची वाट बिकट होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत एक वर्ष गूरं ओळली आणि नंतर मावस भावाने हॉटेलवर वेटर म्हणून कामास नेले. टेबल पुसता पुसता माणसं समजली अनुभवाची शिदोरी मिळत गेली. माझी आई जनाबाई हिची शिकवण होती तू काहीही कर पण व्यसनापासून चार हात लांब राहा तर तुझं भलं होईल चार माणसं चांगलं म्हणतील.

मनिषा या मुलीबरोबर माझा विवाह झाला. विसापूर फाट्यावर भिमाई नावाने छोटे हॉटेल सुरू केले. मनिषाचा माझ्या जीवनात प्रवेश झाला आणि प्रगतीची झेप सुरू झाली. ऋतुजा, अमृत आणि समर्थ ही तीन मुल झाली. २० एकर जमीन पांढरेवाडी खरेदी केली पण कोरडवाहू शेती त्यामुळे शेतीत नफा मिळणे अवघड होते. अशा परिस्थितीत नगर दौंड रोडच्या बाजूला घेतलेली दोन एकर जमीन विकली आणि ४५ लाख खर्च करून मोहरवाडी तलावावरून पाईपलाईन केली मोहरवाडीच्या पाण्याने पांढरेवाडीतील शेतीत जान आली. या पाण्यावर तीन एकर द्राक्ष तीन एकर संत्रा एक एकर लिंबोणी अडीच एकर कढीपत्ता लागवड केली. गुरांसाठी चाऱ्याची पिके केली आहे. त्यामुळे पांढरेवाडीतील कोरडवाहू मळा हिरवागार झाला याचे मनात मोठे समाधान आहे.

शेतीला हक्काचे खत मिळण्यासाठी निलेश जाधव यांच्या गोटफार्ममध्ये भागीदारी केली आहे. या भागीदारीत दुहेरी फायदा होऊ लागला आहे. भविष्यात दहा एकर द्राक्ष बाग करून पूर्ण वेळ शेती करणार आहे. तसे नियोजन केले आहे.

जीव लावून काम केले तर यश निश्चित

सध्या सर्व क्षेत्रात कमालीची स्पर्धा झाली आहे. त्यामुळे जीवनात श्रम आणि व्हिजन शिवाय काहीच मिळणार नाही. मुलांना शेतीत लाईफ घडविण्याची मोठी संधीपण शेतीकडे धंदा म्हणून पाहाणे आणि जीव लावून काम केले तर यश निश्चित मिळेल हा माझा अनुभव आहे.
– शरद भोयटे पांढरेवाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here