Shirurkasar : तहसील प्रशासनाकडून गाजीपूरमध्ये 50 ब्रासचा वाळूसाठा जप्त

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
लाखो रूपयांच्या वाळूचा पर्दाफाश
शिरूरकासार तालुक्यातील शिंदफणा नदीच्या पात्रात गेली अनेक वर्षांपासून वाळूची चोरी काही वाळू माफिया करीत असताना अनेक वेळा कार्यवाही होऊनही हे प्रकार चालूच आहेत. काल शिंदफणा नदी शेजारील गाजीपूर या गावात तब्बल 50 ब्रास वाळूसाठा कर्तव्य दक्ष तहसीलदार बेंडे व त्यांच्या पथकाने पकडला आहे.
या बाबतीत मिळालेली माहिती अशी की, शिंदफणा नदी काठच्या सर्वच गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू माफिया निर्माण झाले असून नदी पात्रातून ते रात्री अपरात्री वाळू घेऊन जाऊन ते विकतातच. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकार सुरूच आहेत. अनेकदा तहसील प्रशासन, पोलिसांनी कार्यवाही करूनही हा त्यांचा उद्योग सुरूआहे. सध्या शिंदफणा नदीच्या पात्रात मोठे पाणी वाहत असताना रात्रीच्या वेळी पोकलेनच्या साह्याने वाळू काढून ती साठवली जात आहे.
दोन दिवसापूर्वी तरडगव्हणमध्ये वाळूसाठा तहसील प्रशासनाने जप्त केला असताना गाजीपूर या गावात तर तब्बल 50 ब्रास वाळू साठा तहसीलदार श्रीराम बेंडे, नायब तहशिलदार सानप, तलाठी बाबा बडे, व कर्मचारी यांनी ही कार्यवाही केली असून 50 ब्रास मधील 15 ब्रास वाळू तहसील कार्यालय आणली असून उर्वरित साठा पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिला आहे. गेल्या काही दिवसापासून तहसील प्रशासनाच्या दबंग कार्यवाहीमुळे तालुक्यातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. गाजीपूर येथे पकडलेला साठा हा लाखो रूपये असल्याने मोठा दंड होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here