Shevgaon : शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करावा – कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ.के. पी. विश्वनाथा यांनी केले. ते केव्हीके दहिगाव-ने यांनी आयोजित केलेल्या शास्त्रीय सल्लागार समिती बैठकीचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादन कंपन्याची स्थापना करावी आपल्या शेतमालाला योग्य दर मिळवून देऊन प्रगती साधावी, असे कुलगुरू यांनी याप्रसंगी सांगितले. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे केव्हीके दहिगाव-ने येथे सहाव्या शास्त्रीय सल्लागार समिती सभेचे आयोजन दि.२५ सप्टेंबर २०२० रोजी करण्यात आले होते. कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सभा पार पडली.

शेतकऱ्यांनी शेतमालाच्या उत्पादनासोबत अधिक नफ्यासाठी शेतमाल विक्रीचे तंत्र अवगत करावे, असे आवाहन मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था व ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख डॉ.नरेंद्र घुले पाटील यांनी केले. ते केव्हीके दहिगाव-ने यांनी आयोजित केलेल्या शास्त्रीय सल्लागार समिती बैठकीच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते. कोव्हीड १९ च्या लॉकडाऊन काळामध्ये देखील शेतकऱ्यांनी आपल्या कर्तव्यापासून मागे न हटता अवघ्या देशाला अन्नधान्य पुरवून देशसेवा केली. शेती क्षेत्राचे महत्व जगाला पटवून दिले. म्हणून शेतकऱ्यांचा सन्मान वाढविणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी ज्ञानार्जनासाठी डिजिटल तंत्रज्ञाच्या वापराविषयी माहिती करून घेऊन त्याचा उपयोग शेती उत्पन्न वाढीसाठी करणे आता काळाची गरज बनलेली आहे, असे डॉ.नरेद्र घुले पाटील यांनी सांगितले.

या प्रसंगी अटारी पुणे झोन ८ चे शास्त्रज्ञ डॉ. अमोल भालेराव यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषी विज्ञान केंद्राची भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये करावयाचे बदल याविषयी विवेचन केले. बैठकी दरम्यान केव्हीके दहिगाव-नेच्या कामाकाजाबाद्दलचा आढावा वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमख डॉ.एस.एस.कौशिक यांनी दिला तर माणिक लाखे यांनी कृती आराखड्याचे सादरीकरण केले.
या सभेसाठी संस्थेचे सचिव काकासाहेब शिंदे, इफको कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक डी.बी. देसाई, भारतीय ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.ज्ञानेश्वर बोरसे, रेशीम विभाग अहमदनगरचे सहाय्यक संचालक बी.डी. डेंगळे, मस्त्यपालन विभागाचे कुडले, म.फु.कृ.वी. राहुरी चे डॉ.भगवान देशमुख, नाबार्ड अहमदनगरचे शिलकुमार जगताप, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगरचे राठी, जिल्हा बियाणे प्रमाणपत्र अधिकारी अहमदनगरचे डी.एस.बरढे, कृषि अधिकारी  कानिफनाथ मरकड, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.एम.बी.लाड उपस्थित होते.

या बैठकीस शेतकरी प्रतिनिधी हुकुमबाबा नवले, काकासाहेब काळे, रतन मगर, रेवणनाथ उकिर्डे, संजय तनपुरे, काकासाहेब घुले, डॉ. दिलीप बर्डे उपस्थित होते. या सल्लागार समिती बैठकीच्या यशस्वीतेसाठी केव्हीकेचे शास्त्रज्ञ  नारायण निबे, नंदकिशोर दहातोंडे, डॉ. सोमनाथ भास्कर, प्रकाश बहिरट, प्रकाश हिंगे, वैभव नगरकर, प्रविण देशमुख, अनिल देशमुख व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बडधे व आभार इजि. राहुल पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here