Newasa : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’तून वगळण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनची निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांवर आधीच्याच जबाबदाऱ्यांचा बोजा लक्षात घेऊन कोरोनाप्रमाणे त्यांना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेतून वगळण्याची मागणी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने अध्यक्षा कॉ.मदिना शेख, सरचिटणीस कॉ.राजेंद्र बावके, सहचिटणीस कॉ. जीवन सुरडे यांनी प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 
नेवासा तहसीलदार, नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना यासंदर्भात दिलेल्या निवेदनात अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनने म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दि.11 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत स्पष्टीकरण करून त्यात कोणते विभाग/कर्मचारी सहभागी होतील याबाबत कळविल्याकडे लक्ष वेधून या मार्गदर्शक पुस्तिकेत पथकामध्ये अंगणवाडी कार्यकर्ती (आवश्यकतेनुसार महिला व बालकल्याण विभागाची परवानगी घेऊन असा स्पष्ट उल्लेख केला आहे) या पथकाने दररोज पन्नास घरांना भेटी देऊन टेम्प्रेचेर तपासणी, गरज पडल्यास इतर सुविधा देणे, घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रिकोविड, कोविड व पोस्ट कोविड यासंबंधी मार्गदर्शन करावयाचे आहे. ही मोहीम दि.14 सप्टेंबर ते दि.24 ऑक्टोबर अशी तब्बल चाळीस दिवस चालणार असल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे.
मात्र, या कामाव्यतिरिक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आहार वाटप, लसीकरण, वजने घेणे, गृहभेटी, पालकांच्या ग्रुपवरून मार्गदर्शन, शक्य तिथे मुलांशी संवाद, सिएएस वर फोटो-माहिती अपलोड करणे, दि.1 सप्टेंबरपासून दहा दिवस पोषण महिना साजरा करणे, व्ही.सी.डी.सी. मध्ये दाखल करणे, परसबाग तयार करणे, आहार विषयक जनजागृती करणे, यासह नियमितपणाने चालणारी कामे करायची असल्याची बाब याद्वारे निदर्शनास आणून देण्यात आली आहे.
त्यामुळेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याची परवानगी महिला व बाल कल्याण विभागाने इतर विभागांना देऊ नये, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दि. 14 सप्टेंबर रोजी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्र्यांसह या विभागाचे सचिव, आयुक्त यांना निवेदन देऊनही त्याचा विचार न करता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत सामावून घेण्यात आल्याने या योजनेसह एकात्मिक बाल विकास योजनेचे काम एकाचवेळी एकत्रितपणे करणे अशक्य बनल्याचा मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे.
यासंदर्भातील व्यावहारिक तसेच तांत्रिक बाबींचा विचार करण्याचे आवाहन युनियनने केले असून यापुढील काळात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी सुशीला गायकवाड, माया जाजू,मदीना ताई, जिवन सुरखे आदी उपस्थित होते.
तर बाल कुपोषण वाढेल
सप्टेंबरपासून दहा दिवस पोषण महिना साजरा करणे, व्ही.सी.डी.सी. मध्ये दाखल करणे, परसबाग तयार करणे, आहार विषयक जनजागृती करणे, यासह नियमितपणाने चालणारी कामे करायची परिणामी एकाच वेळी हे काम आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी हे काम शक्य नसून याचा परिणाम वरील कामावर होऊन निश्चित कुपोषण वाढल्या शिवाय राहणार नाही तरी शासनाने याची दखल घेऊन अंगणवाडी कर्मचारी यांना या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मधून वगळावे.
– राजेंद्र बावके सरचिटणीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here