Aurangabad : उच्च भ्रू वसाहतीतील स्पा-मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा

नागालँडसह शहरातील चार युवती ताब्यात
 
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सिडको, एन-४ भागातील उच्च भ्रू वसाहतीत स्पा-मसाजच्या नावाखाली चालणा-या कुंटणखान्यावर पुंडलिकनगर पोलिसांनी शनिवारी (दि.२६) छापा मारला. या छाप्यात व्यवस्थापकासह नागालँडमधील २ व शहरातील २ अशा चार युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन दिवसापूर्वीच एका मसाज पार्लरमधील तरुणीने या प्रकरणाचा पर्दाफाश करीत पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी ही कारवाई केली.

एका युवतीने २४ सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांना स्पा-मसाज पार्लरच्या नावाखाली शहरातील सिडको व वेदांतनगर भागात कुंटणखाना सुरू असल्याची तक्रार दिली होती. तिला चालक रिजू जोश आणि हर्षल यांनी दोन वर्षांपूर्वी नोकरीचे आमिष दाखवून शहरात आणले होते. त्यानंतर कोकणवाडी भागातील एका स्पा-मसाज पार्लरमध्ये तिला नोकरी दिली होती. काही दिवसांनी तिथे येणा-या ग्राहकांसोबत तिला देह विक्रीसाठी प्रवृत्त करण्यात आले. देह विक्रीला युवती नकार देत असल्याने तिला धमकावण्यात आले होते. मुंबई, पुणे आणि नाशिक येथून युवतींना आणून वाम मार्गाला लावले जात आहे, असेही युवतीने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, सिडको, एन-४ भागात एलोरा स्पा अ‍ॅण्ड वेलनेस प्रा. लिमिटेड हे मसाज पार्लर आहे. एक वर्षापासून हे मसाज पार्लर दत्तू माने व संदीप भालेराव हे चालवत होते. या दोघांनी एका फ्लॅटमध्ये सहा पार्टीशन केलेले आहेत. मसाजसाठी अडीच हजार रूपये आणि कुंटनखान्यासाठी साडेचार ते पाच हजार रूपये ते घेत होते. शनिवारी दुपारी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक मीरा चव्हाण, जमादार रमेश सांगळे, जालिंदर मांटे, बाळाराम चौरे, माया उगले, नंदा गरड, कोमल तायडे, प्रविण मुळे, दीपक जाधव व राजेश यदमळ यांनी छापा मारला.

या छाप्यात पोलिसांनी एन-६ मधील दोन आणि नागालँडमधील दोन युवतींना ताब्यात घेतले. दहा मोबाईलसह १९ हजार ९३० रुपये आणि स्वॅब मशीन हस्तगत करण्यात आले. तसेच व्यवस्थापक बबलू इंगळे, दत्तू माने व संदीप भालेराव यांना देखील ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here