Aurangabad : राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाची आत्महत्या

घाटीच्या कोविड वॉर्डाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन संपविले जीवन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

औरंगाबाद : घाटी रूग्णालयातील सुपर स्पेशालिटी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन एका कोरोनाबाधित रूग्णाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२७) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. काकासाहेब श्रीधर कणसे (वय ४२, रा. धनगाव, पैठण) असे आत्महत्या करणा-या रुग्णाचे नाव आहे. काकासाहेब कणसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, तसेच पंचायत समिती सदस्यही होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

काकासाहेब कणसे यांचा २१ सप्टेंबरला कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने २४ सप्टेंबरला दुपारी चार वाजेच्या सुमारास अतिदक्षता विभागाच्या वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये दाखल करण्यात येऊन त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांनी शौचालयाला जायचे असल्याचे घाटीच्या कर्मचा-याला सांगितले होते.

व्हेंटिलेटरवर असलेल्या रूग्णाला शौचालयात नेण्याची परवानगी नसल्याने, त्यांना पॉट देण्यात आले. त्यानंतर कर्मचारी बाहेर थांबले होते. काकासाहेब कणसे यांनी कोणालाही न सांगता, त्याच्या बेडजवळ असलेल्या खिडकीतून खाली उडी मारली, अशी माहिती सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर जाधव यांनी दिली. या घटनेची नोंद बेगमपूरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

या घटनेची चौकशी व्हावी – माजी आमदार संजय वाघचौरे
काकासाहेब कणसे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर घाटीच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये दाखल करण्यात आले होते. २४ सप्टेंबर रोजी काकासाहेब कणसे यांना व्हेंटिलेटर मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यावेळी बेड उपलब्ध असूनही दोन तासांनी काकासाहेबांना बेड देण्यात आले होते, अशी माहिती माजी आमदार संजय वाघचौरे यांनी दिली. तसेच काकासाहेबांनी आत्महत्या का केली? याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

मला खासगी रूग्णालयात दाखल करा
रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास काकासाहेब कणसे यांनी आपला भाऊ गणेश कणसे याला फोन करून तू औरंगाबादला ये असे सांगितले. त्यानंतर पुन्हा काकासाहेब कणसे यांनी भावाला फोन करून मला लवकरात लवकर खासगी रूग्णालयात दाखल कर असे सांगितले. गणेश कणसे हे इमारतीच्या जवळ आले. परंतु त्यांना सुरक्षा रक्षकांनी आतमध्ये जाऊ दिले नाही. शेवटी सकाळी ११ वाजेच्या सुमारास काकासाहेब कणसे यांनी इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले, असे गणेश कणसे यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here