Shrigonda : कुकडीच्या स्वतंत्र कार्यालयाचा फायदाच – आमदार पाचपुते

स्वतंत्र कार्यालयाची आपली मागणी जुनीच

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कुकडीचे कार्यालय श्रीगोंदा तालुक्यासाठी स्वतंत्र पाहिजे ही आपली जुनीच मागणी होती. फक्त त्यावर आता अंमलबजावणी झाली आहे. पण स्वतंत्र कार्यालय असल्यावर श्रीगोंदा तालुक्याच्या पाणी वाटपाला निश्चितच फायदा होणार असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले.
कर्जतसाठी कुकडीचे स्वतंत्र कार्यालय होणार आहे. त्यामुळे श्रीगोंद्याचे महत्व कमी होईल, अशी शक्यता अजिबात नाही उलट पाणी वाटपाच्या वेळेस श्रीगोंद्याला नक्कीच फायदा होणार आहे. कारण सध्या श्रीगोंदा कार्यालयाच्या अंतर्गत कर्जत तालुक्यातील येसवडी चारी व राशीनचा भाग येत आहे. पाणी वाटपाच्या वेळेस या चाऱ्याची गणना श्रीगोंद्याच्या हद्दीत होत होती. त्यामुळे पाणी वाटपाला अडचणी येत होत्या पण आता कर्जतसाठी स्वतंत्र कार्यालय होत असल्यामुळे श्रीगोंद्याचा भार कमी होणार आहे.
मुख्य वितरिका क्रमांक १४ च्या खालील भाग कर्जतला जोडला जाणार आहे. आपल्या तालुक्याच्या हद्दीतील भाग श्रीगोंदा कार्यालयाच्या अंतर्गत येणार आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्याचा काही भाग कुकडी किलोमीटर ७० ते ११० किमीपर्यंतचा भाग नारायणगाव कार्यालयाला जोडला आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच्या काही भागातील शेतकऱ्यांना नारायणगाव कार्यालयाला जाणे अवघड होत आहे. हा भागही श्रीगोंदा कार्यालयाला जोडणे गरजेचे आहे. ही मागणी आपण पूर्वीपासूनच केलेली आहे. आता त्या मागणीवर अंमलबजावणी सुरु झाली आहे, असे पाचपुते म्हणाले.
स्वतंत्र कार्यालयाचा फायदाच होणार आहे – पाचपुते 
कुकडीचे कार्यालय विभक्त झाल्यामुळे श्रीगोंद्याच्या हक्काच्या पाण्याला न्याय भेटणार आहे. कारण यापूर्वी कर्जतच्या काही भागाचे पाण्याची गणना ही श्रीगोंद्याच्या पाण्यात होत होती. त्यामुळे यापुढे श्रीगोंदा तालुक्याला फायदा होणार असल्याचे पाचपुते म्हणाले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here