Kada : मेहकरी पिंपळगाव रस्त्यावरील पूल पावसाने गेला वाहून

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
तालुक्यातील मेहकरी व पिंपळगाव दाणी या दोन गावांना जोडणाऱ्या मेहकरी नदीवरील पूल जोरदार पावसामुळे वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे दोन्ही गावातील नागरिकांचा रस्त्यामुळे संपर्क तुटला आहे. 
मागील तीन चार वर्षांपासून आष्टीकर भीषण दुष्काळाचा सामना करीत होते. मात्र, यावर्षी निसर्गाने साथ दिल्यामुळे सर्वदूर चांगला पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातील रुटी इमनगाव व कांबळी प्रकल्प वगळता लहान-मोठे प्रकल्प भरले आहेत. परंतु दररोजच्या पावसामुळे आता नुकसान होऊ लागले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील मेहकरी, चिचोंडी या भागात जोरदार पाऊस झाल्याने सदरील पाणी मेहकरी धरणात आल्याने या धारणाचे पाणी मेहकरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात आले. त्यामुळे मेहकरी व पिंपळगावदाणी या दोन गावांना जोडणाऱ्या मेहकरी नदीवरील पूल या जोरदार पाण्यामुळे नुकताच वाहून गेला.
त्यामुळे दोन्ही गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच मार्गावरची वाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी हा पूल करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून नागरिकांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here