Shirurkasar : तालुक्यात अतिवृष्टी; पिक पाण्यात तर नद्या ओव्हर फ्लो

ओला दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची मागणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

आठ दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्याला दमदार पावसाने तडाखा दिल्यामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्यातील रायमोहा मंडळात 31 मिमी शिरुर मंडळात 33 मिमी तर तींतरवणीमध्ये 71 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने खरिपाचे पिक पाण्यात आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

गत महिन्यातच तालुक्यातील सर्व लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यामुळे कालच्या पावसाने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सुरुवातीला हवाहवासा वाटणारा पाऊस नागरिकांसह बळीराजाला देखील नकोसा झाला असून शेतात उभ्या असलेल्या पिकांना पाण्यात ठेवण्याचे आणि आडवे करण्याचं काम करत आहे. मुगाची अगोदरच वाट लागलेली असताना आता कापूस आणि तुरीवर पाणी फेरण्याचे काम वरुणराजा करत आहे. तालुक्यातील तींतरवणी महसूल मंडळातील सर्व नद्या काठोकाठ भरून वाहत आहेत. तर सावरगांव आणि बोरगावला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहिले आहे.
शिरूरचा सिद्धेश्वर बंधारा सुरुवातीपासूनच ओव्हरफ्लो झाला असून सिंदफणा नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. पिकांची परिस्थिती फार अवघड झाली असून बळीराजाच्या हातातोंडाशी दिसणारा घास अतिवृष्टीमुळे हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली असून ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देऊन आधार देण्याचे काम करावे, अशी मागणी होत आहे.
कृषी अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर पंचनामे
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे शेतातील उभ्या असलेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी पाहणी दौरा करतील. त्यानंतर कोणत्या भागात पिकांचे किती नुकसान झाले आहे. या संदर्भात चर्चा होऊन तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांची तीन सदस्यीय समिती स्थापन करून पंचनामे करण्यात येतील.
श्रीराम बेंडे – तहसीलदार,शिरुर-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here