कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाच्या तयारीला सुरूवात

कोल्हापूर : राज्यातील मंदिर आणि धार्मिक स्थळं अजून सुरू झाली नसली तरी कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. मंदिराच्या स़जावटीचे देखील काम आता युद्धपातळीवर सुरू झाले आहे. सध्या मुख्य शिखराचे रंगकाम पूर्ण झाले असून, विद्युत रोषणाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा होणारा नवरात्रोत्सव यंदाच्या वर्षी देखील भक्तांविना असला तरी मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हंटले आहे. खरंतर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक अशी ओळख असलेल्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव हा सर्वात मोठा सण असतो. यावर्षी कोरोनामुळे राज्यातील सर्वच मंदिरे बंद आहेत. घटस्थापना जरी १७ ऑक्टोबर रोजी असली, तरी आता केवळ पंधरा ते वीस दिवस उरले आहेत. या काळात मंदिरे सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मंदिरात नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. शिवाय देवीची दररोज विविध रुपात पूजा सुद्धा बांधण्यात येणार आहे. उत्सवाच्या तयारीला आजपासून सुरुवात करण्यात आली असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here