Politics: तीन-चार दिवसांत एकनाथ खडसेंचा निर्णय!

Rashtra sahyadri updates

जळगाव: आपल्या पक्षांतरासंदर्भात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा विषय जुना झाला असून आता तीन-चार दिवसात आपण मोठी बातमी देऊ, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे दिली. भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ऑनलाइन सहभागानंतर खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. या बैठकीनंतर ही खडसे समाधानी नसल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले.


पक्षातील विविध आघाड्यांवर सातत्याने डावलले जात असल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे हे नाराज असून याविषयी त्यांनी अनेक वेळा उघड भाष्य केले आहे. त्यानंतर मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी महिनाभरात आपण निर्णय घेणार असून दुस-या पक्षात केवळ काय पद मिळते याची प्रतीक्षा आहे, असा संवाद असलेली ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लीप व्हायरल होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आणि त्यानंतर दुस-याच दिवशी भाजपची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत एकनाथ खडसे हे आपल्या जळगावात येथील निवासस्थानातून सहभागी झाले होते.


या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय संघटक प्रमुख संतोष कुमार, केंद्रीय मंत्री सतीश गंगवार, विजय पुरानिक, सुधीर मनगुंटीवार आदी नेते सहभागी झाले होते. या बैठकीत पक्ष संघटन, विविध राजकीय घडामोडी व इतर विषयांवर चर्चा झाली.


या बैठकीमध्ये काय चर्चा झाली याविषयी माहिती देणे खडसे यांनी टाळले. तसेच कार्यकर्ता व खडसे यांच्यातील संवादाच्या व्हायरल झालेल्या क्लिपबद्दल विचारले असता तो विषय आता जुना झाला असून तीन-चार दिवसात मोठी बातमी देतो, असे सांगून बैठकीनंतरही समाधान झाले नसल्याचे संकेत खडसे यांनी दिले. या बैठकीमध्ये ऑडिओ क्लिपविषयी देखील विचारणा झाल्याची माहिती असून त्याविषयी मात्र खडसे यांनी बोलणे टाळले. तसेच क्लीपमधील संवादानंतर राष्ट्रीय स्तरावरील नेते खडसे यांची भूमिका जाणून घेण्यासाठी सहभागी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here