Crime: हाथरस पीडितेवर बलात्कार झालाच नाही… संशयितांवर खुनाचा गुन्हा!

नवी दिल्ली: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेवर बलात्कार झाला नसल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. पीडितेने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबाच्या आधारे संशयित आरोपींवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या अहवालानुसार पीडितेच्या मृत्यूचे मुख्य कारण गळ्याचे हाड तुटणे, असे सांगण्यात आले असल्याने आता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चौघा संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
पीडितेचा शवविच्छेदन अहवालात या धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला. अलीगढ मेडिकल महाविद्यालयाचा हा अहवाल आहे. आधी पीडितेला दाखल करण्यात आले होते त्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात पीडितेच्या शरीरावरील जखमांच्या खुणांचा उल्लेख केला गेला आहे तर हाथरसच्या पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार,

‘अलीगढच्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात जखमांचा उल्लेख आहे, पण त्यात जबरदस्तीने शारीरिक संबंधांची पुष्टी केलेली नाही. आत्तापर्यंत डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की ते बलात्काराला दुजोरा देत नाहीत, याबद्दल ते तेव्हाच सांगू शकतील जेव्हा त्यांना एफएसएल रिपोर्ट मिळेल.’


सफदरजंग रुग्णालयाद्वारे देण्यात आलेल्या अहवालात म्हटले गेले आहे की पीडितेच्या गळ्यावर जखमांच्या खुणा आहेत आणि सोबतच गळा दाबल्याचेही दिसून आले आहे. पीडितेच्या मृत्यूचे मुख्य कारण व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच कळेल. १४ सप्टेंबर रोजी या घटनेनंतर पीडितेला अलीगढच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण तिची परिस्थिती आणखी बिघडली तेव्हा २८ तारखेला तिला सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले. २९ तारखेला सकाळी तिचा मृत्यू झाला.पीडितेच्या मृत्यूनंतर आता चारी संशयित आरोपींवर खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे चारी संशयित त्यांच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०२अन्वये खुनाचा गुन्हा नोंदवला जाणार आहे. दरम्यान या १९ वर्षीय पीडितेवर बुधवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठीही तिच्या कुटुंबियांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर आरोप केला आहे की अंत्यसंस्कार करण्याआधी त्यांना विचारण्यात आले नाही.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here