Social work: वंचितांच्या मदतीसाठी ‘फेसबुक फ्रेंड्स’ पोहचले खानापूर जवळील हसनवाडीच्या जंगलात..!

अमृत बिर्जे । राष्ट्र सह्याद्री

बेळगाव:

समाजमाध्यमात अनेक चुकीचे संदेश पसरविले जातात, समाजाची दिशाभूल केली जाते, फसवणुकीचे प्रकार घडतात…. अशा तक्रारी सातत्याने होत असल्याने समाजमाध्यमे आणि त्यावर जमणारी मंडळी नेहमी टीकेचे धनी होतात. तथापि, या विचारप्रवाहाला छेद देत चांगुलपणाचा संदेश देण्याचे काम ‘फेसबूक फ्रेंड्स सर्कल’ या सामाजिक संस्थेने केले आहे.

येथील फेसबूक फ्रेंड्स सर्कल या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील जंगल भागात असणाऱ्या हसनवाडी या गावात झोपडीवजा घरात राहणाऱ्या रहिवाशांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

या जंगल भागातील छोटा च्या वस्तीवर शनिवारी जाऊन या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी हे साहित्य वाटप केले. हसनवाडी गावात दहा एक झोपडीवजा घरांची छोटीशी वस्ती आहे. एकमेकांच्या आधाराने या ठिकाणी जवळपास 80 च्या आसपास लोकवस्ती असून यामध्ये लहान मुलांची संख्या ही मोठी आहे. ठिगळे जोडून कशाबशा तयार केलेल्या झोपड्यांमध्ये या रहिवाशांचे वास्तव्य आहे. ना वीज, ना पाणी किंवा कोणतीही जीवनावश्यक वस्तू जवळपास नसतानाही या जंगल भागातील रहिवाशांचे अनेक वर्षापासून या झोपडीत वास्तव्य आहे. पाण्यासाठी सुमारे किलोमीटर पायपीट करावी लागते तर येथील मुलांच्या अंगावर अंग झाकण्यासाठी धड कपडेही नाहीत तर पायातील चप्पल तर दूरच राहिले, बाजूच्या गावातील शाळेत जाण्यासाठी येथील मुलांना घनदाट जंगलातून ये-जा करावी लागते. मात्र येथील मुलांसह येथील रहिवासी आनंदाने वास्तव्य करीत आहेत. औषधेही मिळणेतर दूरच आहेत त्यासाठी समाजातील या अत्यंत तळागळातील नागरिकांना फेसबुक फ्रेंड सर्कल या सामाजिक संस्थेच्या वतीने समाजातील दानशूर मंडळींच्या सहकार्याने जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. तसेच लवकरात लवकर येथील मुलांना आवश्यक कपडे, चप्पल, शैक्षणिक तसेच खेळाचे साहित्य यासह जीवनावश्यक वस्तू असे जे काही ही पुरवता येईल ते उपलब्ध करून देण्याची गरज आहे. आणि संस्थेच्या वतीने लवकरच पुन्हा एकदा या जंगलातील गावात जाऊन येथील रहिवाशांना या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती फेसबूक फ्रेंड्स सर्कल या सामाजिक संस्थेचे संतोष दरेकर, अमित पर्मेकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी ‘राष्ट्र सह्याद्री’ प्रतिनिधीशी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here