Corona Story: “…अखेर कोरोना महाराज व त्यांच्या या शिष्यांच्या सत्संगातून आमची सुटका झाली”

शिवशाहीर तनपुरेंनी मिश्किल व सकारात्मक मानसिकतेने केली कोरोनावर मात


आधी डोकेदुखी ताई आल्या…त्यांनी लवून मुजरा केल्यावर तीन दिवस ये-जा व सेवा सुरू ठेवली….त्या गेल्यावर मग अंगदुखी ताई आल्या….त्यांची सेवा झाल्यावर मग सर्दीआक्का व मेहुणे ताप यांनी आमंत्रण न देता येणे केले….या सर्वांनी आमची सेवा केली व आम्हीही मनापासून त्यांचा पाहुणचार केला व अखेर कोरोना महाराज व त्यांच्या या शिष्यांच्या सत्संगातून आमची सुटका झाली”….अशा मिश्किल व सकारात्मक शैलीतील निवेदन कोरोनाची भीती बाळगणारांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे. राहुरीचे दिव्यांग शिवशाहीर विजयराव तनपुरे यांनी कोरोनाच्या आजारावरील उपचार घेतल्यावर त्याचा अनुभव सोशल मिडियातून शेअर केला आहे. अनेकांनी त्याला लाईक्स केले आहेत.

या आजाराची भीती न बाळगता सकारात्मक भावनेने त्याकडे पाहिल्याने तसेच मानसिक सक्षमतेने आजाराचा सामना केल्याने मी बरा झालो आहे. त्यामुळे नागरिकांनीही या आजाराला घाबरू नये. ‘करमत नसेल तर कर्मरत राहा व आजारापासून दूर राहा’, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यानिमित्ताने दिला आहे.


राहुरीचे शिवशाहीर विजयराव तनपुरे हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा शाहिरीतून प्रचार व प्रसाराला त्यांनी अवघे आयुष्य वाहून घेतले आहे. दिव्यांगांसह वयोवृद्धांसाठी शिवाश्रम प्रकल्पही त्यांनी हाती घेतला आहे. या सगळ्या कामात असताना लोकांशी संपर्क येत असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली व नगरलाच त्यांनी उपचार घेतले. त्यानंतर बरे झाल्यावर त्यांनी या उपचारांचे अनुभव सोशल मिडियातून शेअर केले.

कोरोना आजार व उपचारांचे अनुभव कथन करताना सोशल मिडियातील पोस्ट शाहीर तनपुरेंनी मिश्किल शैलीत लिहिली आहे. ते यात म्हणतात- भयंकर डोके दुखत होते. असं वाटायचं की मुंडके बाजूला काढून ठेवावे की काय. संपूर्ण अंग ठणकत होते. हात-पाय गळून गेले होते. घसा दुखत होता. ताप तर इतका होता की ओला रुमाल दोन मिनिटात सुकून जायचा. प्राणायाम 18 दिवस बंद राहिल्याने मी कोरोनाच्या तावडीत सापडलो असे वाटते. 29 ऑगस्टला हात दुखत असल्याने डॉ. प्रतापराव गिरगुणे यांनी मला व्हॉटसअपवर गोळ्या लिहून पाठवल्या आणि पंधरा दिवस जीम बंद करायला सांगितली. म्हटलं जीम बंद झाली म्हणून काय झाले… आपले रोजचे प्राणायाम तरी करू. पण भस्रिका करताना हाताच्या कोपरावर ताण येत होता, म्हणून मी सर्वच प्राणायाम बंद केले आणि 18 सप्टेंबरपासून हळूहळू एक-एक दुखणं वाढायला लागले. ‘आराम हराम आहे’ याची मी अनुभूती घेतली. म्हणून माणसाने करमत नसेल तर कर्मरत राहावे, असे सांगून त्यात त्यांनी पुढे म्हटले की, 30 सप्टें रोजी नगर येथील डॉ. युवराज टकले यांच्या दवाखान्याच्या एका विशेष खोलीमधे कोरोना महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सत्संगाची सांगता झाली… कारण, कोरोना महाराज माझ्याशी वागताना पूर्ण त्यांचे १०० % योगदान देऊन सकारात्मक वागले. ते आम्हाला म्हणाले, “महाराज, मला जाणीव आहे की आपल्यासमोर नकारात्मक विचाराचा कोणीही टिकू शकत नाही. म्हणूनच मी सुध्दा सकारात्मकपणे तुमच्या सानिध्यात आलोय….कोरोना महाराजांचे सांगणे ऐकून चेहऱ्यावर मिश्किल हसू आले आणि २३ सप्टेंबरपासून आमची व कोरोना महाराज अशी चर्चा सुरू झाली. पण चर्चेला ते मात्र मौनात होते. पण त्यांच्यावतीने पाच-सहा जण अगदी तयारीचे असलेले त्यांचे शिष्य होते ना. त्यातली त्यांची पहिली शिष्या आली- तिचे नाव होते डोकेदुखी. ती आली व लगेच अगदी लवून आम्हाला मानाचा मुजरा केला व निःस्वार्थपणे आपल्या सेवेला तिने सुरुवात केली. तशी ती अधुनमधुन येतच राहायची. पण तास-दोन तास सेवा करून निघून जायची. पण यावेळी तिने सलग दोन दिवस आपले १०० % योगदान देऊन खूप सेवा केली. मग आम्ही तिला म्हणालो, तुझं ऐकलं ना आता, मग हे निरोपाचे विडे घे आणि जा बरं आता. तशी तिने आवरायला सुरवात केली आणि तिसऱ्या दिवशी मानाचा मुजरा करून निघून गेली. पण लगेच अंगदुखीताई आल्या आणि मला म्हणाल्या, महाराज, माझापण शिधा घ्या, मला का बरं नाराज करता. मग तिनेही तीन दिवस भरपूर सेवा केली. मग सर्दी आक्का व तिचा मेहुणा ताप यांनीही विनंती केली व आम्हालाही आपल्या सेवेचं पुण्य मिळू द्या म्हणाले. मग घसादुखीनेही चालू कामातच आपलीही सेवा रुजु केली. आमच्या नजरेत अतिथी देवो भवः असल्याने सर्वांचा पाहुणचार केला आणि २६ तारखेला सर्वांना मोठ्या प्रेमाने निरोप दिला. मग डॉ.अमित व डॉ. युवराज टकले यांनी विनंती केली की, महाराज, या सर्वांचा पाहुणचार करून आपण थकलात म्हणून ३० तारखेपर्यंत आमच्या दवाखान्यातच विश्रांती घ्या. आम्ही त्यांना म्हणालो, डॉक्टरसाहेब, तुम्ही व तुमची टीम आमच्यासोबत दिमतीला होती म्हणुन मला त्या सर्व पाहुण्यांचा पाहुणचार करायला खूप मदत झाली. त्य़ामुळे आता पुढील तीस दिवस आम्ही राहुरीला घरातच शांत राहणार आहोत. म्हणून आपणासही विनंती आहे की, आपणही 30 ऑक्टोबरपर्यंत फोन करू नये. मात्र, दिवसातून दोनदा 20/25 मिनिटे व्हॉटसअपवर असू. आपल्या सर्वांच्या मेसेजचे उत्तर स्वत: देऊ. कारण, आपण आमच्या जिवाभावाचे आहात. मोबाईल हे आज वरदान आहे. पण जास्त त्यामधे विनाकारण वेळ खर्च करू नका. शेवटी लाईटचे बटन दाबून त्या उजेडाचा फायदा घ्यायचा की, होल्टरमधे बोट घालून शॉक लावून घ्यायचा, याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आता आपण एकच करा आपला परिवार व आपण यांचीच काळजी घ्या.अजुन काही महिने प्राणायाम करा, त्यामधे हलगर्जीपणा करू नका. आळस केल्याने काय होतं, हा आमचा अनुभव सांगतो. बोअर नाही झाले ना… नाहीतर ज्यांना बोर झाले असेल… त्यांनी एकदा टाळ्या वाजवा….अशा मिश्किल शैलीतील हे कथन सोशल मिडियावर वाचणारांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here