Ahmednagar Crime: गुलाबाच्या शेतात गुटख्याचा लाखो रुपयांचा साठा..!

शहरालगत असलेल्या गोडाऊन वर पोलिसांचा छापा; ट्रकभर गुटखा जप्त

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

श्रीरामपूर: लॉकडाऊन मध्ये फुलशेती अडचणीत आल्याने तेथे गोडाऊन करून गुटख्याचा साठा करण्यात आला. गुटख्याचा अवैध व्यापार करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांच्या वादातून पोलिसांना टीप देण्यात आली. सुमारे ट्रकभर गुटखा गोडाउनमध्ये उतरताच पोलिसांनी छापा टाकून गुटखा जप्त केल.  विशेष म्हणजे एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची ही शेती आहे.  

पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजेच्या सुमारास ही कारवाई झाली. श्रीरामपूर शहरालगत असलेल्या एकलहरे शिवारात शेख कुटुंबीयांची ही शेती आहे तर सुलेमान नावाच्या व्यापाराचा हा गुटखा आहे. अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांना गुप्त सूत्रांकडून गुटखा साठ्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने छापा टाकला.

काही दिवसांपूर्वी बेलापूर येथे गुटखा पकडण्यात आला होता. त्यावेळी गुटखा व्यापाऱ्यांच्या वादातून अन्न औषध प्रशासनाला टीप देण्यात आल्याची चर्चा होती. त्याच वादातून आता ही टीप पोलिसांना देण्यात आल्याचे बोलले जात आहे. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून या गोडाऊन मधून गुटखा व्यापार सुरू होता; मात्र स्थानिक पोलिसांना त्याची खबर लागली नाही याबाबत ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गोडाऊनमध्ये गुटखा येताच अवघ्या दोन तीन तासात त्याची विल्हेवाट लावली जाते, त्यामुळे हा गुटखा पकडणे, मोठे आव्हान होते. पोलीस चार दिवसांपासून पाळत ठेऊन होते. संबंधित शेतीचा उताराही पोलिसांनी आधीच काढला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here