हा तर ऑनर किलिंग चा प्रकार? हाथरस प्रकरणातील आरोपींनी केला दावा

हाथरस:

सध्या देशभरात गाजत असलेल्या हाथरस बलात्कार प्रकरणात दररोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. यातच आता या प्रकरणातील मुख्य आरोपींनी खळबळजनक दावा केला आहे. आरोपींनी हाथरसच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहुन स्वत:वरील सर्व आरोप नाकारले आहेत.

या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप याची पीडित मुलीशी मैत्रीचे सबंध होते पण पीडितेच्या कुटुंबीयांचा याला विरोध होता. त्यामुळे पीडितेच्या आई आणि भावानेच तिला मारल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

या पत्रावर लवकुश, रवी, रामकुमार उर्फ रामू आणि संदीप उर्फ चंदू अशा सर्वांच्या अंगठ्याचा ठसा आहे.

मुळात हे प्रकरण ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा आरोपींचे म्हणणे आहे. त्यामुळे आमच्यावर लावलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. आम्ही निर्दोष आहोत असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मुख्य आरोपी असलेल्या संदीपने आपली पीडितेशी मैत्री असल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही फोनवर बोलायचो, एकमेकांना भेटतही होतो. हीच गोष्ट पीडितेच्या कुटुंबीयांना आवडत नसे . दुर्घटनेच्या दिवशीच मी तिला शेतात भेटलो असताना तीची आई आणि भाऊ तिच्यासोबत होते. त्यांच्या सांगण्यावरून मी लगेच तिथून निघून गेलो. यानंतर मी घरी येऊन गुरांना चारापाणी देण्याचे काम करत होतो, असे संदीपने पत्रात म्हटले आहे.

काहीवेळानंतर पीडितेला तिच्या आई व भावाने मारहाण केल्याची गोष्ट गावकऱ्यांकडून माझ्या कानावर पडली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली व उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मी पीडितेला कोणत्याही प्रकारे मारहाण केलीच नाही. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांनी मला या प्रकरणात अडकवले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी व आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी आरोपींनी पत्रात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here