पिंपरणेत जि. प. शाळा बनली तळीरामाचा अड्डा

मोकळ्या दारूच्या बाटल्यांचा खच
प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
पिंपरणे : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तळीरामांनी आपला अड्डा बनविला आहे. त्यामुळे कोरोनामुळे बंद पडलेल्या शाळांच्या इमारतीच्या परिसराचा दुरुपयोग होऊ लागला आहे. जिल्हा परिषद शाळेच्या पडवीत बसून तळीरामांनी मोकळ्या बाटल्या टाकून दिल्याचे दिसून आल्याने संताप व्यक्त होत आहे.
देशात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सर्वच लढा देत असताना दुसरीकडे मात्र तळीरामांना आपल्या गरजा भागविण्यासाठी धडपड सुरू असल्याचे दिसत आहे. दारू दुकाने सुरू झाल्याने अवैधरित्या दारू विक्री होत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे. गावठी दारू व देशी, विदेशी दारूचा साठा केला जात आहे. शाळाबंद असल्यामुळे मद्य शौकिन शाळेच्या पडवीतच शौक पूर्ण करत आहेत या तळीरामांची टोळी चांगलीच बळकट होत असल्याचे चित्र आहे. कितीही बंद ठेवा परंतु आम्ही आमचे व्यसन पूर्ण करणारच म्हणत तळीरामांकडून गावांमध्ये धुडगूस सुरूच आहे.लोकवर्गणीतून गतकाळात या शाळेच्या इमारतीला रंगरंगोटी करून, बोलके चित्र काढून शाळेच्या दोन्ही इमारती सुसज्ज केल्या होत्या.
दरम्यान, पिंपरणे जिल्हा परिषद शाळा कोरोना मुळे सध्या बंद आहे शाळा बंदचा फायदा घेत सदरच्या ठिकाणी काही तळीरामांनी बैठक मांडत पार्टी केल्याचे चित्र दिसून आले आहे. दारूच्या बाटल्या, वेफर्स पाकीटांचा खच शाळेच्या खोल्या समोर दिसून आला. याप्रमाणे एकीकडे करोना विरोधात लढाई सुरू असताना दुसरीकडे मात्र, तळीरामांकडून नियमांची ऐशी तैशी केली जात आहे. तर बंद शासकीय कार्यालय व शाळांचा वापर तळीराम आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी करीत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here