Shrigonda: कोरोनाकाळात फुटपाथवर छोटे व्यवसाय करून शोधला नवा रोजगार…

  • File picture

पालिकेच्या कारवाईमुळे ‘त्यांच्या’वर आली उपासमारीची वेळ

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा: करोनाच्या टाळेबंदीमध्ये तालुक्यात विविध ठिकाणी भरणारे आठवडा बाजार प्रशासनाने बंद केले आहेत. या बाजारांमध्ये विविध प्रकारचा भाजीपाला, सुकी मच्छी, कडधान्ये, किरकोळ सामान विकणारे विक्रेते शहरी भागातील फुटपाथवर येऊन आपला लहानसा व्यवसाय करू लागले आहेत. मात्र या ठिकाणावरूनही त्यांना स्थानिक प्रशासनाने हाकलून दिल्याने त्यांच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

करोनाच्या टाळेबंदीमुळे आजही येथील अनेक कारखाने बंद आहेत. कुठेही रोजगाराची संधी उपलब्ध नाहीत. रोजचे हातावर पोट असलेल्यांसाठी सध्या ग्रामीण भागात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या कठिण परिस्थितीला तोंड देण्यासाठी अनेकांनी फळे, भाजीपाला, वडापावाची हातगाडी तर काहींनी कटलरी वस्तूंची दुकाने मुख्य बाजारपेठेतील रस्त्यालगत मिळेल त्या ठिकाणी थाटली आहेत. मात्र येथील नगरपंचायत प्रशासनाने या पथविक्रेतांना दुसरीकडे कुठेही सोयीची जागा उपलब्ध करून न देता त्यांना हटविले आहे.

या लहानशा व्यवसायातून या पथविक्रेत्यांची दररोजची पेटणारी चूल विझल्याने आम्हाला रोजगार द्या अन्यथा जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरपंचायतीकडे केली आहे. तालुक्यातील अनेक खेडोपाडय़ांतून लहान शेतकरी, शेतमजूर आपल्या परसबागेत पिकविलेला भाजीपाला, काकडी, दोडके, फुले, कडधान्ये टोपलीमध्ये घेऊन शहरात विक्रीस येतात, मात्र या शेतकऱ्यांनाही येथील प्रशासनाने बंदी घातल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here