नदीपात्रातील वाळू लिलावासाठी सुरू केल्या हालचाली :, नदीकाठच्या शेतकर्‍यांचा लिलावास विरोध

श्रीरामपूर : जिल्ह्यातील मुळा, प्रवरा, गोदावरी नद्यांचे पाणी कमी होताच जिल्हा प्रशासनाने नदीपात्रातील वाळू घाटाच्या लिलावासाठी हालचाली सुरु केल्या आहे. जिल्ह्यातील २३ ठिकाणच्या वाळू घाटांचे लिलावाचे प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दाखल झाले आहेत. राहुरी, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव येथील तहसील कार्यालयांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणी होणार आहे.राहुरी, श्रीरामपूर तालुक्यातील गावाचा वाळू लिलावास विरोध असल्याची चर्चा समोर येत आहे.

जिल्हा प्रशासनाकडून अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयात २३ वाळू घाटाचे प्रस्ताव मागील महिन्यात दाखल केले आहेत. त्यानुसार उपप्रादेशिक अधिकारी संजीव रेदासनी यांनी पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणीची सूचना जाहीर केली आहे.
तीन नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राहुरी येथे व दुपारी तीन वाजता श्रीरामपूर येथे तसेच पाच नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राहाता येथे व दुपारी तीन वाजता कोपरगाव येथे तहसीलदार कार्यालयात पर्यावरण विषयक लोक सुनावणी होणार आहे. सुनावणीत लेखी स्वरूपात सूचना व तक्रारी मागविण्यात आलेल्या आहेत.

यंदा नगर जिल्ह्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला. सर्व नद्या दुथडी भरून वाहिल्या आहे नदीपात्रामधील जुने वाळूचे खड्डे भरून, नवीन वाळू साठे जमा झाले. नद्यांमधील पाणी कमी होताच वाळूतस्करांनी नदीपात्र ओरबडण्यास सुरुवात केली. विशेषतः राहुरी तालुक्यात वाळू तस्करीला उधाण आले आहे. त्यातील काही वाळूतस्कर वाळू साठ्यांच्या लिलावात भाग घेऊन, उखळ पांढरे करण्याच्या तयारीत आहेत.

तालुकानिहाय वाळू घाटांच्या लिलावाची ठिकाणे

राहुरी – (मुळा व प्रवरा नदी) पिंप्री वळण, राहुरी खुर्द, वळण, चंडकापूर, रामपूर व सात्रळ. राहाता – (प्रवरा नदी) पुणतांबा व रस्तापूर. श्रीरामपूर – (प्रवरा नदी) वांगी खुर्द, नायगाव (क्र.एक व क्र. दोन), मातुलठाण (क्र. एक, दोन, तीन), कोपरगाव – (गोदावरी नदी) कोकमठाण, संवत्सर, कोळगाव थडी, जेऊर, सोनारी, पाटोदा, सांगवी भुसार, सुरेगाव व गोधेगाव आदी गावाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here