hathras: मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Rashtra Sahyadri Updates…
हाथरस:
सध्या बलात्काराच्या प्रकरणी गाजत असलेले हाथरस पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते मानवी तस्करी प्रकरणी. हाथरसमध्ये मानवी तस्करीविरोधी युनिटने मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
एक १७ वर्षीय मुलगी हाथरसच्या बस थांब्यावर शनिवारी रात्री उशिरा सापडली. तेथील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात नेले. तिच्याकडे चौकशी केली असता, तिने धक्कादायक माहिती दिली. दिल्लीतील तस्करांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून पलायन केलेल्या या मुलीने तीन दिवस पायी चालून २०० किलोमीटर अंतर कापून हाथरसला पोहोचल्याचे सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने मुलींना एका खोलीत अनेक दिवस डांबून ठेवले होते. मुलींना त्या व्यक्तीवर संशय आला. त्या सर्व जणांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी मुलींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. तसेच आरोपी व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. ज्या ठिकाणी डांबून ठेवले होते, ते नेमके ठिकाण मुली सांगू शकत नाहीत.

एका व्यक्तीने मध्य प्रदेशातील १२ मुलींना काम देण्याच्या कारणाने दिल्लीला नेले होते. एका कोणत्या तरी शहरात खोलीत अनेक दिवसांपासून उपाशीपोटी डांबून ठेवले. मात्र, संधी मिळताच मुली तेथून पळाल्या, अशी माहिती या मुलीने दिली. हाथरसचे पोलीस अधीक्षक विनीत जयसवाल यांनी सांगितले की, शनिवारी रात्री उशिरा कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की बस थांब्यावर एक १७ वर्षीय मुलगी सापडली आहे. मध्य प्रदेशातील मंडलामधील तोगल गावातील ती राहणारी असल्याची माहिती मिळाली. आठवडाभरापूर्वी कुटुंबीयांच्या सहमतीने गावातील १२ मुलींना एक व्यक्ती दिल्लीला घेऊन जात होता. त्यांना शिवणकाम देणार असल्याचे त्याने सांगितले होते.

१२ मुलींनी स्वतःची सुटका करून घेतली असे मुलीने सांगितले आहे. त्या मुलींना उपाशीपोटी डांबून ठेवले होते. ही मुलगी गेल्या तीन दिवसांपासून चालत होती. दरम्यान मुलीला चाइल्ड हेल्पलाइन टीमकडे सोपवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here