‘या’ वाक्यातच स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जीवनाचे सार… पंतप्रधान मोदींनी काढले गौरवोद्गार!

अहमदनगर : 

गाव, गरीब आणि शेतकरी यांच्या हितासाठी स्वर्गीय डॉ. बाळासाहेब विखे पाटील आयुष्यभर झिजले. सहकार आणि सत्तेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आत्मचरित्राच्या “देह वेचवा कारणी” या शिर्षकातच त्यांच्या जीवनाचे सार आहे. हे पुस्तक आपल्यासह तरुणांना नक्कीच प्रेरणा देईल, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

आज डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदीनी या आत्मचरित्राचे प्रकाशन केले आहे. विखे पाटील यांचे गाव आणि गोरगरीबांच्या विकासासाठी आणि शिक्षणाबद्दलचे योगदान तसेच महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील यशासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, असे त्यांचे कार्य अनेक पिढ्याना प्रेरणा देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातील मराठीतून महाराष्ट्राचा गौरव करत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. मी आधीच वेळ दिला होता. मात्र, कोरोनामुळे येथे येऊ शकलो नाही. आज व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून व्हर्चुअल पध्दतीने पुस्तकाचे प्रकाशन करतोय, असे म्हटले. मी डॉ. विखे पाटील यांचे काम पाहिले आहे. “समाजासाठी राजकारण आणि सत्ता हे पथ्य मी नेहमी पाळले”, असा आत्मचरित्रातील उल्लेख मोदींनी मराठीत सांगितला. समाज्याच्या भल्यासाठी त्यांनी काम केले आहे. देशात पहिल्यांदा शेतकऱ्यांची चिंता त्यांनी व्यक्त केली. अनेक योजना राबविल्या. शेतीत नविन आणि जुन्या पध्दतीचा ताळमेळ ठेवण गरजेचे आहे. साखर कारखान्यातून आता इथेनॉलही उत्पादन होत आहे. इथेनॉलचा वापर वाढला की बाहेर जाणारा पैसा शेतकऱ्यांच्या खिशात येईल, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here