राज्यमार्गावरील खड्डे बुजविणार कधी :, पावसाच्या विश्रांतीनंतरही महामार्गावरील खड्डेच – खड्डे कायम

कोल्हार खुर्द : प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाची तीर्थक्षेत्र शिर्डी आणि शिंगणापूर यांना एकत्र जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे नगर – मनमाड हा राज्यमार्ग आहे. मात्र गेल्या तीन महिन्यापासून नित्याने कोसळत असलेल्या पावसामुळे या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सध्या कोरोनामुळे सदर तीर्थक्षेत्र बंद असले तरी, या मार्गावरून नियमित मार्गक्रमण करीत असलेल्या स्थानिक नागरिक ,नोकरदार, शेतकरी वर्गातून या निकृष्ट कामाबद्दल तीव्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.
नगर मनमाड राज्यमार्गाला राज्यातच नव्हे, तर देशात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात अनन्यसाधारण महत्वाचे मानले जाते, कारण याच राज्यमार्गामुळे आंतरराष्ट्रीय धार्मिक तीर्थक्षेत्र असलेले शिर्डी आणि शिंगणापूर एकमेकांना जोडले आहेत. त्यामुळे अवघ्या जगभरातून साईभक्त आणि शनिभक्त या राज्यमार्गावरून प्रवास करीत असतात. मात्र याच नगर मनमाड राज्यमार्गाची परिस्थिती आजची अत्यंत वेदनादायी झाल्याचे दिसत आहे.
या रस्त्यावर कोल्हार परिसरातील बिरोबा मंदिर परिसर, साईध्यान मंदिर परिसर,भोसलेनगर परिसर तसेच प्रवरा नदीवरील पुलावर मोठया प्रमाणात गुडघाभर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच प्रवरानदीवर असलेल्या नविन पुलावर देखील मोठया प्रमाणात खड्डे असल्यामुळे याच ठिकाणी वाहनाचा खोळंबा होतो आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू असलेल्या या पुलावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
मध्यंतरी झालेल्या पावसाने रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाकडून माती मिश्रीत मुरुमाचा केविलवाणा प्रयोग करण्यात आला. मात्र पावसाने उघड देताच रस्त्याच्या बाजूला असलेल्या रहिवाशी आणि व्यवसायिकांच्या घरात आणि दारात धुळीचे लोळ पसरले आहेत.
त्याचप्रमाणे या ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीत अनेक शेतकरी, नोकरदार अडकून पडत असल्यामुळे कुठल्याही महत्वाच्या कामांना मोठा विलंब होत आहे. तसेच कोरोना महामारीमुळे दिवसभर याच राज्यमार्गावरून रुग्णवाहिका देखील मोठया प्रमाणात धावत असल्यामुळे त्यांना देखील या वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पडावे लागत आहे ,
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी,नोकरदार तसेच कोल्हार खुर्द, भगवतीपुर ,कोल्हार बुद्रुक येथील ग्रामस्थांमधून होत आहे

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here