Letter war: राज्यपालांना संविधान मान्य नाही का?

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा सवाल… भाजपवाले धर्माचे राजकारण करीत असल्याची टीका

नगर: मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्यात मंदिर उघडण्यावरून झालेल्या पत्रव्यवहारावर भाष्य करताना माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपवर टीका केली. ‘गेल्या पस्तीस वर्षे मी विधिमंडळाच्या राजकारणात आहे. आतापर्यंतच्या राज्यपालांनी अशाप्रकारचे विधान केले, हे मला तरी आठवत नाही. राज्यपालांना संविधान मान्य नाही का ? त्यांनी शपथ घेताना संविधानाची शपथ घेतली नाही का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘राज्यपालाच्या खुर्चीवरून अशा प्रकारचा जातिवाद किंवा भेदभाव केला जात असेल तर हे जनतेने व राज्याने पाहिलेले पहिलेच उदाहरण आहे,’ असेही खोतकर म्हणाले.

‘भाजपवाल्यांना धर्माचे काही देणेघेणे नाही, केवळ लोकांचे भावना भडकवायच्या आणि राजकारण करायचे, असा त्यांचा धंदा आहे’ अशा शब्दात त्यांनी टीका केली. खोतकर हे आज नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी राज्यात मंदिर उघडण्यासाठी भाजपने केलेल्या आंदोलनावर बोलताना राज्यातील भाजप नेत्यांवर तोफ डागली.

ते म्हणाले, ‘मंदिर उघडण्याबाबत जी मागणी आमच्या पूर्वीच्या मित्र पक्षाकडून होत आहे, ती मागणी हास्यास्पद आहे. कारण राज्यात करोनाची तिव्रता अजूनही आहे. राज्यांमध्ये मृत्यूचा दर म्हणावा तसा कमी झालेला नाही. पण फक्त कोणत्याही बाबीमध्ये भाजपला राजकारण करायचे आहे. भावनिक गोष्टींना हात घालायचा व लोकांना भडकावयाचे आणि द्वेषाचे राजकारण करायचे, अशी भाजपची पद्धत आहे. मंदिर हा विषय हातात घेतला तर सर्वसामान्य माणसे आपल्या बाजूने उभी राहतील , मग सर्वसामान्य माणसे मेली तरी चालतील , पण त्यांच्याशी यांना काही घेणे देणे नाही. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार भाजपवाल्यांचा आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला. ‘राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे समर्थपणे राज्यामध्ये काय केले पाहिजे, काय नाही केले पाहिजे, हे ठरवतात व राबवतात,’ असा दावा त्यांनी केला.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here