Shrirampur District: थेट अमेरिकेतून श्रीरामपूर जिल्हा निर्मितीची हाक..!

कोरोना काळातही लढा सुरूच; प्रजासत्ताक दिनापासून आंदोलन अधिक तीव्र करणार…

श्रीरामपूर: कोरोना संकटातही श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचा ध्यास व लढा सुरूच आहे. अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे वारे वाहत असताना रविवारी थेट अमेरिकेतूनही श्रीरामपूर जिल्हा निर्मितीची जोरदार हाक देण्यात आली. तसेच येत्या २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनापासून श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
कोरोना संकटातून हळूहळू बाहेर येत असताना श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या चळवळीला नव्याने गती देण्याचा निर्णय रविवारी झालेल्या आँनलाईन बैठकीत घेण्यात आला. श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव भोसले यांनीे या बैठकीत अमेरिकेतून सहभागी होत बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. समितीचे पदाधिकारी, सदस्य विविध ठिकाणाहुन या आँनलाईन बैठकीत सहभागी झाले होते. समितीचे अध्यक्ष बाबासाहेब औताडे,सुनंदा आदिक, मिलिंदकुमार साळवे, सुरेश ताके, शरद डोळसे, क्षितिज सुतावणे, तिलक डुंगरवाल, मुकुंद गोहिल , करीम शेख,जुबेर इनामदार आदी उपस्थित होते.
समितीची पुढची बैठक येत्या १ नोव्हेंबर ( रविवारी ) सकाळी १० वाजता ऑनलाईन माध्यमातून घेण्याचे यावेळी ठरले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत जिल्हा विभाजन, नवीन जिल्हा निर्मितीबाबत अतिरिक्त प्रधान सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीचा अहवाल
राज्य सरकारला सादर झालेला आहे. त्याचा मंत्रालयीन पातळीवर श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने पाठपुरावा करावा, अशी सूचना मिलिंदकुमार साळवे यांनी केली.
समितीच्या व्हॉटसअप ग्रुप वर सतत येत असलेल्या राजकीय व जातीयवादी पोस्ट्स वर नाराजी व्यक्त करत प्रतापराव भोसले यांनी यापुढे अशा पोस्टस् सदस्यांनी टाळून समितीच्या मंचावर फक्त समितीच्या कार्याच्या दृष्टीने चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच पुढील बैठकीत आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह नगरसेवक व इतर सर्व पक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी होतील, यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली.
उपस्थित असलेल्या सर्वच सदस्यांनी चळवळ पुन्हा सक्रिय करण्याची गरज व्यक्त केली. शरद डोळसे व तिलक डुंगरवाल यांनी आंदोलनाच्या दृष्टीने काही ठोस सूचना समितीच्या विचाराधीन आणाव्यात असे सांगितले.
तालुक्यातील सर्वच राजकीय नेत्यांचा या चळवळीला पाठिंबा मिळवण्याच्या दृष्टीने त्यांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी डोळसे, ताके यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानुसार आगामी बैठकीत याबाबत ते सर्वांना माहिती देतील.
२६ जानेवारीपासून समितीचे आंदोलन अतिशय तीव्र करण्याची भूमिका ताके व औताडे यांनी मांडली. त्याला उपस्थित सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले.
येत्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट ठरवण्याची जबाबदारी डोळसे यांनी घेतली. समितीतील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन याभेटीचे नियोजन करण्याचे ठरले.
ग्रामीण भागात चळवळ नेण्याची गरज सुनंदा आदिक यांनी व्यक्त करून त्यादृष्टीने समितीने प्रयत्न करावेत असे सांगितले.
समितीचे समन्वयक क्षितिज सुतालणे बैठकीचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here