Health: ग्रामीण आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी केंद्राची 10 हजार कोटींची ‘आयुष्यमान सहकार’

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या विकासासाठी सहकारी संस्थांना १०,००० कोटी रुपयांची कर्जे मिळणार, देशातील जवळपास ५२ रुग्णालये सहकारी तत्वावर, या रुग्णालयांना वैद्यकीय आणि आयुष शिक्षणासाठी मदत मिळणार

नवी दिल्ली:  ग्रामीण भारतातील आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणेसाठी केंद्र सरकारने ‘आयुष्यमान सहकार’ योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ ग्रामीण भारतातील आरोग्य सेवा पायाभूत सुविधांच्या ( for the development of rural primary health services) विकासासाठी सहकारी संस्थांना १० हजार कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. आयुष्यमान भारतच्या धर्तीवर ही योजना राबविण्यात येईल.
सोमवारी सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान सहकार योजनेंतर्गत सहकारी संस्थांना ग्रामीण भागातील रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यासाठी आणि इतर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी कर्ज देण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सोमवारी आयुष्यमान सहकार या नवीन योजनेची सुरुवात केली. या योजनेंतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या विकासासाठी सहकारी संस्थांना १०,००० कोटी रुपयांची कर्जे देईल. देशातील जवळपास ५२ रुग्णालये सहकारी संस्था चालवित आहेत. या रुग्णालयांमध्ये बेडची संख्या ५ हजार आहे.

आयुष्यमान सहकार योजना’ ग्रामीण भागातील रुग्णालयांची स्थापना, आधुनिकीकरण, विस्तार, दुरुस्ती, नूतनीकरण, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांचा समाविष्ट करेल. हे सहकारी रुग्णालयांना वैद्यकीय आणि आयुष शिक्षण सुरू करण्यास मदत करेल. योजनेच्या आवश्यकतेनुसार कार्यशील भांडवल आणि मार्जिन मनी देखील प्रदान करेल. ही योजना महिलांचा जास्त समावेश असणाऱ्या सहकारी संस्थांना एक टक्का व्याज सूट उपलब्ध करुन देईल.


तसेच एनसीडीसी फंडाद्वारे सहकारी संस्थांच्या आरोग्य सेवेच्या तरतूदीस प्रोत्साहित केले जाईल. आरोग्य सेवेसाठी योग्य तरतूद असलेल्या सहकारी संस्थांना एनसीडीसीकडून कर्ज मिळू शकेल, असे सरकारने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. एनसीडीसीकडून ही आर्थिक मदत राज्य सरकारमार्फत किंवा थेट पात्र सहकारी संस्थांना दिली जाईल.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here