सिने-नाट्य अभिनेत्री गीतांजली कांबळे यांचे निधन

प्रसिद्ध सिने आणि नाट्य अभिनेत्री सौ. गितांजली कांबळे यांचे वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. गेल्या आठ वर्षापासून त्या कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने पीडित होत्या. मुलुंड म्हाडा कॉलनी येथील त्यांच्या राहत्या घरी शुक्रवारी पहाटेच्या वेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गीतांजली यांनी सही रे सही नाटकात अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत केलेला अभिनय आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. तसेच झी वाहिनी वरील कुंकू ही त्यांची मालिका खूप गाजली होती.

बकुळा नामदेव घोटाळे, टाटा बिर्ला आणि लैला, गलगले निघाले या सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या वस्त्रहरण नाटकातही त्यांनी साकारलेली भूमिका दाद देऊन गेली. गीतांजली यांनी ५० पेक्षा जास्त व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर गीतांजली कांबळी यांचे पती लवराज कांबळी यांच्या नाटकांमध्ये देखील त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. गीतांजली यांच्या जीवनावर ‘बायको खंबीर, नवरो गंभीर’ या मालवणी नाटकाची निर्मिती लवराज यांनी केली आहे.

गीतांजली यांना २०१२ पासून कॅन्सरची लागण झाली. मात्र त्यावर मात करीत त्यांनी अनेक नाटके, सिनेमा व मालिकांमधून विविध भूमिका केल्या आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत ४० पेक्षा जास्त किमोथेरपी झाल्या होत्या. मात्र लॉकडाऊन मध्ये त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली. त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी मुलुंड स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here