अन्नातून विषबाधा बहिण भावंडांचा मृत्यू

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

राहाता : अन्नातून झालेल्या विषबाधेने राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील दोन सख्या बहिण भावंडांचा ऐन दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या चिमुकल्यांचे मामा व आजी या घटनेत अत्यावस्थ आहे. या घटनेने पाथरे बुद्रूक सह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथरे बुद्रूक यथील प्रवरा नदीच्या कडेला असणाऱ्या मुलांसह येथील गल्लीत वसिम रज्जाक शेख हे आपल्या कुटुंबीया समवेत राहत असून, ते आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून आपली उपजीविका चालवितात. वसिम यांना मुलगा अरहान (वय ५ वर्षे ) व मुलगी आयेशा (वय ४ वर्षे) ही दोन आपत्ये असून, वसिम यांची सासुरवाडी हनुमंतगांव (कोंबडवाडी) हाकेच्या अंतरावर आहे. वसिम याची दोन्ही मुले अरहान व आयेशा यांचे नेहमी मामा शाविद आजिज शेख यांचे घरी जाणे येणे होते. गत दोन तीन दिवसापासुनही नेहमी प्रमाणे अरहान व आयेशा मामा शाविद यांच्या घरी गेले असता, दरम्यानच्या काळात मामा शाविद व सदर भाचा भाची सह शाविद चे कुटुंबीय यांना दोन दिवसापासून थोडी शारीरीक अस्वस्थता जाणावयाला लागली असता, त्यांनी सोनगांव,सात्रळ येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यास सुरुवात केली होती. परंतु ऐन दसऱ्याच्या दिवशी रविवारी सकाळी ९ च्या दरम्यान अरहान व आयेशा,मामा शाविद व आजी शबाना यांची प्रकृती खालावत चालल्याने नातेवाईकांनी त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मुलगा अरहान यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले.त्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने मुलगी आयेशा हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन भाच्याचा दुर्दैवी मृत्यूची वार्ता मामा शाविद यांना समजल्याने त्यानां मानसिक धक्का बसल्याने रुग्णालयातच पुढील उपचारासाठी अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर आजी शबाना ही रुग्णालयात उपचार घेत आहे. सदर घटनेत मृत झालेल्या अरहान व आयेशा यांच्या मृतदेहाचे प्रवरा ग्रामीण रुग्णालयातच शवविच्छेदन करण्यात येवून त्यांचा पाथरे बूद्रूक येथे सायंकाळी दफनविधी करण्यात आला.दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही घटना अन्नातून विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूची खरी माहिती समोर येईल. या घटनेची लोणी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पोलिस नार्इक संतोष लांडे हे अधिक तपास करत आहेत.

सदर घटनेतील वसिम शेख हे हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असताना त्यांना असणारी दोनही आपत्य या घटनेत मृत पावल्याने शेख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पंचक्रोशीत या घटनेची हळहळ व्यक्त होत आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here