राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रस्तावाला उद्याचा मुहूर्त? खडसेंचे नाव मात्र अनिश्चित

मुंबई : कोरोना काळामुळे पुढे ढकललेल्या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रस्तावाला बुधवारचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. मागच्या कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव येणार अशी चर्चा सुरु होती. पण काही कारणास्तव हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला होता.

मागच्या कॅबिनेट बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात बैठकही झाली होती. मात्र ऐनवेळी प्रस्ताव न आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, आता राज्यपाल नियुक्त 12 नावांना मंत्रिमंडळाची मंजूरी देऊन ती नावं मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांचे नाव असणार का? याबाबत देखील राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप एकनाथ खडसेंचं नाव निश्चित झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी चार नाव देणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here