कृषी विद्यापीठच्या कर्मचाऱ्यांचा वेतन आयोगाच्या मागणीकरिता आंदोलनचा इशारा

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

राहूरी : कृषी विद्यापीठातील अधिकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग पुर्वलक्षी प्रभावाणे लागू करण्यासाठी आणि 10/20/30 वर्षानंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना लागू करण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरातील समन्वय संघाचे सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचारी, यांनी एकत्र येत सामाजिक आंतर राखून प्रशासकीय इमारतीच्या बाहेर आंदोलनाच्या दुसर्‍या टप्प्यातील आंदोलनचा इशारा देण्यात आला. 
        यावेळी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांना सातव्या वेतन आयोगाच्या मागणी संदर्भात निवेदन विद्यापीठ समन्वय संघाचे वतीने देण्यात आले. 
       आज केलेल्या आंदोलनानंतर आंदोलकांनी विद्यापीठ परिसरात दुपारी 1.00 ते 1.30 पर्यत श्रमदान केले. आजपासून दिनांक 2.11.2020 पर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत.

         यावेळी कुलसचिव मोहन वाघ यांनी सांगितले की, चारही कृषि विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात येत्या दोन – तीन दिवसात शासनाकडून महत्वाचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. 
      विद्यापीठातील कर्मचार्‍यांच्या इतरही काही मागण्या असतील, तर त्यावर तोडगा काढण्यासंदर्भात लवकरच दर महिन्याला ठराविक दिवशी कर्मचारी दरबार भरविण्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले. या आंदोलनाचे प्रास्तविक समन्वय संघाचे कार्याध्यक्ष डॉ. महावीरसिंग चौहान यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी दिनांक 2 नोव्हेंबर ते 5नोव्हेंबर पर्यंत लेखणी बंद आंदोलन करतील. दिनांक 6 नोव्हेंबर रोजी एक दिवस सामुहिक रजा देवून आंदोलन करतील. दिनांक 7 नोव्हेंबर पासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन करतील.     

समन्वय संघाचे उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम यांनी सांगितले की, कर्मचार्‍यांना आश्वासित प्रगती योजना लागु होणे महत्वाचे असून वर्षानुवर्ष पदोन्नती अभावी एकाच पदावर राहणार्‍या वर्ग तीन व चारच्या कर्मचार्‍यांना यामुळे फायदा होईल. तसेच आमच्या वेतन आयोगाच्या मागणी संदर्भात शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. समन्वय संघाचे सरचिटणीस मच्छिंद्र बाचकर यांनी आभार मानले. यावेळी समन्वय संघाचे गणेश मेहेत्रे, मच्छिंद्र बेल्हेकर, डॉ. संजय कोळसे, सौ. सुरेखा निमसे इ.पदाधिकारी उपस्थित होते. 
       याप्रसंगी मध्यवर्ती परिसरातील सर्व अधिकारी व कर्मचारी सामाजीक आंतर राखत मोठ्या संख्येने उपस्थित होते. समन्वय संघाचे हे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसुल मंत्री, कृषि मंत्री, विरोधी पक्षनेते, मुख्यसचिव, प्रधानसचिव, महासंचालक, कृषि परिषद यांना देण्यात येणार आहे. आज झालेल्या आंदोलनाप्रमाणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 10 जिल्ह्यांमधील संशोधन केंद्रे, कृषि महाविद्यालये या ठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here