सदिच्छा मंडळात उभी फूट : पारनेरसह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मंडळाला सोडचिठ्ठी

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी
पारनेर- शिक्षक बँकेच्या राजकारणातील सर्वात जास्त काळ सत्तेवर राहिलेले मोठे मंडळ व अनेक मंडळाचे मातृमंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे. या मंडळाला अखेरची घरघर लागली आहे. या मंडळाचे नेते दत्तात्रय राळेभात,राजेंद्र शिंदे, रवींद्र पिंपळे यांच्या मनमानी आणि अरेरावीला कंटाळून अखेर सदिच्छा मंडळात मोठी फूट पडली असून आज पारनेर येथे झालेल्या बैठकीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

यावेळी बोलताना अनेक कार्यकर्त्यांनी सदिच्छा मंडळाच्या या नेत्यांवर मनमानीचा आरोप करून  त्रैवार्षिक अधिवेशनात हुजरेगिरी करणाऱ्यांना संघटनेत पदे दिली. ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्तेंवर अन्याय करून संघटना मोडीत काढण्याचे धोरण अवलंबले असल्याचे स्पष्ट केले .ज्यांनी अनेक मंडळ फोडली, अनेक संघटना फोडल्या अशा नेतृत्वाच्या हाती सदिच्छा मंडळ आल्यापासून सदिच्छा मंडळ बॅकफूटवर गेले अाहे. शिक्षकांचे अनेक ज्वलंत प्रश्न असताना या नेत्यांचे लक्ष मात्र सतत बँकेकडे असते.

शिक्षकांच्या  प्रश्नांबद्दल या मंडळाला कोणतेही भविष्य राहिलेली नाही .निष्ठावान कार्यकर्तेंवर  अन्याय केला जातो. त्यांना बाजूला काढले जाते. त्यांच्या विचारांना अजिबात महत्त्व दिले जात नाही, म्हणून जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी सदिच्छा मंडळ सोडण्याचा निर्णय घेतला आहे .शिक्षक बँकेची निवडणूक जवळ आल्यामुळे शिक्षक राजकारणाला वेगळे वळण लागले असून हा सदिच्छा मंडळाला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

गोकुळ कळमकर हे संघटनात्मक व शिक्षकांच्या कामासाठी तळमळीचे व आक्रमक नेते म्हणुन सर्वसामान्य शिक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत.या नेतृत्वाला खुजे करण्याचा प्रयत्न सदिच्छा मंडळातीलच आर्थिक तडजोडीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जोडगोळींनी चालविला असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
यापुढे गोकुळ कळमकर, नवनाथ तोडमल हे काय भूमिका घेतात, कोणत्या मंडळात प्रवेश करतात की नविन मंडळ काढतात ,याकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षकांचे लक्ष लागले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here