वीज वाहिनीतून आगीचे लोळ पडल्याने तीन एकर ऊस जळून खाक : लाखो रुपयांचे नुकसान

 राष्ट्र सह्यादी / प्रतिनिधी  
श्रीगोंदा :   मढेवडगाव  येथील गंगाधर तुकाराम शिंदे यांच्या वांगदरी  शिवारातील  ऊसात वीज वितरण कंपनीच्या मुख्य वाहिनीतून विजेचे लोळ  पडल्याने मंगळवारी त्यांचा कारखान्याला गाळपासाठी तयार असलेला तीन एकर ऊस जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.      
 याबाबत सविस्तर माहिती अशी की मढेवडगाव येथील रहिवासी गंगाधर शिंदे यांची शेजारीच वांगदरी शिवारात ऊस शेती आहे. त्यांच्या ऊस शेतीच्यावरून वीज वितरण कंपनीची मुख्य वीजवाहिनी गेली आहे. परंतु विजेच्या   तारा  एकमेकांना चिकटल्यामूळे आगीचे लोळ तयार होऊन काही दिवसांत तोडणीला आलेल्या उसात पडल्यामूळे ऊसाने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा पाहून आसपासच्या शेतकऱ्यांनी धाव घेत ऊस विझवण्याचा प्रयत्न केला व शेजारी शेजारी जवळपास २५-३० एकर उभा ऊस होता. आगीवर नियंत्रण आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तोपर्यंत ३ एकर ऊस जळून खाक झाला.या नुकसानीत शेतकऱ्याची लाखो रुपयांची हानी झाली आहे.
           घटनास्थळी काष्टी वीज उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. उपअभियंता गैरहजर असल्याने दुसऱ्या दिवशी पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या वीज वाहक तारा व खांबांची अवस्था जीर्ण व गंभीर आहे. ५० वर्षांपूर्वी बसवलेल्या तारा व खांब अजूनही वापरात आहेत. यापूर्वीही वीज मंडळाचा भोंगळ कारभार दिसून आला आहे. मढेवडगाव येथील दोन शेतकऱ्यांचा तुटलेल्या तारांना चिकटून मृत्यू झाला होता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here