अंबानी कुटुंबाची झेड प्लस सुरक्षा वादात

मुंबई : श्रीमंतीत जगात एक नंबरवर असणारे अंबानी कुटुंबाला देण्यात येणारी झेड प्लस सुरक्षा मागे घेण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने मांडलेल्या मतावर नाराजी व्यक्त करत उच्चस्तरीय सुरक्षा ज्यांच्या जीवाला धोका आहे त्यांना दिली जावी. तसेच जे त्यासाठी पैसे मोजू शकतात त्यांना नाही असं स्पष्टपणे सांगितलं.

अंबानी हे स्वतःची व कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊ शकतात त्यामुळे जनतेच्या पैशांवर राज्य सरकार सुरक्षा पुरवत असल्याचे याचिकेत सांगण्यात आले आहे. यावर उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना ” रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडच्या महसुलाचा जीडीपीवर ही प्रभाव पडतो. त्यांच्या जीवाला असलेला धोका दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा नागरिकांना देखील सुरक्षा देण्याची जबाबदारी सरकारची असते.”

हिमांशू अगरवाल यांनी आपल्या वकिलामार्फत खंडपीठाला सांगितलं की, कोणताही धोका नसताना किंवा तसा कोणताही पुरावा नसताना एखाद्या खासगी व्यक्तीला झेड प्लस सुरक्षा देणे चुकीचं आहे. दरम्यान अंबानी बंधूंची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी सरकार पुरवत असलेल्या सुरक्षेसाठी अंबानी पैसे मोजत असल्याची माहिती दिली. यावर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी जीवाला धोका असल्याचा समज असून त्यासाठी ठोस कारण असलं पाहिजे असा युक्तिवाद केला.

“जर एखाद्याला आपल्या जीवाला धोका जाणवत असेल आणि खर्च उचलण्याची तयारी असेल तर राज्य सरकार त्याला सुरक्षा पुरवणार का?,” अशी विचारणा यावेळी सुप्रीम कोर्टाने केली. खर्च उचलू शकतात त्यांनाच सुरक्षा दिली जावी याला आमची संमती नाही असं सुप्रीम कोर्टाने यावेळी स्पष्ट सांगितलं.

सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली. मात्र राज्य सरकारला अंबानी कुटुंबाला योग्य ती सुरक्षा पुरवण्यासाठी धोक्याचा आढावा घेण्यास सांगितलं आहे. अंबानी त्यासाठी पैसे भरण्यास तयार आहेत याबाबत आमच्या मनात कोणती शंका नाही असंही सुप्रीम कोर्टाने मुकूल रोहतगी यांना सांगितलं.

हिमांशू अगरवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने हिमांशू अगरवाल यांची अंबानी बंधूंची झेड प्लस सुरक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळली होती.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here