सिनेस्टाईल पाठलाग करून चोरीची बोलेरो पकडली वाहन चालकच निघाला चोर

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

दौंड :   पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर रात्री पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सिनेस्टाईल यवत ते पाटस असा सुमारे 25 किलोमिटर पाठलाग करून चोरीला गेलेली एक बोलेरो गाडीसह एकजण ताब्यात घेतला आहे.

मावळ तालुक्यातील पवनानगर येथून ही गाडी चोरीला गेली होती. ही गाडी पाटस येथे पकडण्यात आली. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. विजय रमेश सोनकांबळे (वय २० वर्षे रा.पवनानगर, ता.मावळ) असे या वाहन चोरणारा आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, २७ ऑक्टोबरला पवनानगर (ता.मावळ ) येथील मंगेश रामचंद्र कालेकर यांची महिंद्रा बोलेरो जीप (नं. एमएच १४ सीसी ७९४७ ) ही चोरीस गेली होती. कालेकर यांनी दिवसभर गाडीचा शोध घेतल्यानंतर सायंकाळी सहा वाजता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला गाडी चोरीची तक्रार दाखल केली होती. तसेच कालेकर यांचा कामगार वाहन चालक विजय सोनकांबळे हा सुद्धा गायब झाला होता. यामुळे त्यानेच ही जीप चोरी करून पोबारा केल्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना दिली.

त्यानुसार पोलीसांनी तात्काळ चोरी झालेल्या जीपचा नंबर व वर्णनासह माहिती नियंत्रण कक्षा मार्फत वायरलेस व पोलीस व्हॉटसअप ग्रुपवर देवून तिचा शोध घेणेबाबत अंमलदार यांना सुचना दिलेल्या होत्या.            सदर जीप चोरीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी बोलेरो जीप चोरी बाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या व्हॉटसअप ग्रुपवर सर्व अमलदारांना देवून जीपची माहिती घेणेबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांना सदर बोलेरो जीप ही पुणे बाजूकडे गेलेली असून ती पुणे सोलापूर महामार्गावरून नांदेड दिशेला घेवून जाण्याची शक्यता 
असल्याची माहिती मिळाली होती.

पुणे सोलापूर महामार्गावर पेट्रोलिंग करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकास सदर जीप प्रवास करत असल्याचे निदर्शनास आल्याने ति थांबण्याचा इशारा केला परंतु वाहनचालकांने ती न थांबल्याने यवत पासून तिचा सिनेस्टाइल पाठलाग करून पाटस येथील टोल नाक्या जवळ ही जीप व वाहनचालकाला ताब्यात घेतले.     

सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा. सचिन गायकवाड, महेश गायकवाड,निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, गुरु जाधव आदींनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here