इंदुरीकर महाराज प्रकरणी पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला …….

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी
संगमनेर : संतती प्राप्ती बाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना आज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. इंदुरीकर प्रकरणाची आज न्यायाधिशांसमोर सुनावणी होणार होती. परंतु त्यांच्याकडे अन्य प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरु असल्याने. पुढील तारीख 25 नोव्हेंबर देण्यात आली आहे.

निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी,  न्यायालयात समक्ष हजर राहण्याबाबत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशा विरोधात येथील जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सरकार पक्ष व बचाव पक्ष आपापला युक्तिवाद करणारे होते. मात्र ज्या न्यायाधिशांसमोर सुनावणी सुरू होणार होती.  त्यांच्याकडे अन्य प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरु असल्याने इंदुरीकर प्रकरणाला आता 25 नोव्हेंबर ही पुढील तारीख देण्यात आली आहे.

किर्तनातून समाजातील अनिष्ट रुढी व परंपरांवर आघात करत समाज प्रबोधन करणार्‍या किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी एका कार्यक्रमात अपेक्षित असलेली संतती प्राप्त करण्यासाठी सम आणि विषम तीथीचे पुराणातील दाखले दिले होते. त्यावर आक्षेप घेत अंधश्रद्धा निर्मुलन समितीने जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केल्यानंतर जूनमध्ये तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भंवर यांनी संगमनेरच्या प्रथमवर्ग  न्यायालयात पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पुढील तारीख देत न्यायालयाने इंदुरीकरांना समक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात इंदुरीकर महाराज यांनी, अ‍ॅड.के.डी.धुमाळ यांच्यामार्फत संगमनेर जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.  जिल्हा न्यायालयातील या सुनावणीच्या वेळी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने अ‍ॅड.रंजना गवांदे-पगार यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती या याचिकेवर गेल्यावेळी त्यावर युक्तिवाद होवून अखेर न्यायालयाने अंनिसची हस्तक्षेप याचिका मंजूर करतांना त्यांना या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान लिखित म्हणणे मांडण्याची मुभा देत पुढील सुनावणी आज (ता.28 ) ला
होणार होती. आज सुनावणी असल्याने  संगमनेर नगरपालिकेच्या आवारातील जिल्हा न्यायालयाच्या परिसरात आज सकाळपासूनच माध्यम प्रतिनिधी सह नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र आज ज्या न्यायाधिशांसमोर या  प्रकरणाचा युक्तिवाद होणार होता, त्यांच्या समोर अन्य प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरु असल्याने दुपारी 3 वाजता इंदुरीकरांच्या प्रकरणाला 25 नोव्हेंबर ही पुढील तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे या तारखेला पुढील सुनावणी होणार आहे.-

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here