मनोरूग्ण मातेने पाजले चिमूकल्याला गटाराचे पाणी

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

औरंंगाबाद : मनोरूग्ण असलेल्या मातेने आपल्या २० दिवसाच्या चिमूकल्याला गटाराचे पाणी पाजल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२८) दुपारी उघडकीस आला. ही धक्कादायक घटना गांधीनगर भागात घडली असून क्रांतीचौक पोलिसांनी चिमूकल्याला उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल केले आहे.
गांधीनगर परिसरात राहणारी शिला (नाव बदलले आहे) ही मनोरूग्ण महिला आहे. शिलाला २० ते २२ दिवसापूर्वी प्रसूती झाली तिला मुलगा झाला होता. मुलगा झाल्यावरही शिला बाळाला नातेवाईकांकडे देत नव्हती. तसेच बाळाचे संगोपनही व्यवस्थीत करीत नव्हती. शिला बाळाला मारहाण करायची तसेच त्याला गटाराचे पाणी पाजत होती.

या घटनेची माहिती बुधवारी दुपारी क्रांतीचौक पोलिसांना मिळाल्यावर क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिता बागुल यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

उपनिरीक्षक बागुल यांनी शिलाच्या ताब्यातून बाळाला सुखरूपपणे काढुन घेतले, त्यावेळी बाळाची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी बाळाला आणि शिलाला उपचारासाठी घाटीत दाखल केले. बाळाची प्रकृती आता स्थिर असून शिलाला गुरूवारी उपचारासाठी मानसोपचार तज्ञाकडे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here